सोलापुरातील माजी रणजी क्रिकेटपटू उमेश मनोहर दास्ताने यांचे काल रात्री कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. मध्य रेल्वेतून मुख्य तिकिट निरीक्षकपदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

उमेश दास्ताने (वय 64) यांनी 1977-78 साली महाराष्ट्र विरूध्द गुजरात रणजी क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पंधरा रणजी सामने खेळले होते. उत्कृष्ट फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ते प्रसिध्द होते. रणजीनंतर त्यांनी रेल्वे क्रिकेट संघाकडून खेळायला सुरूवात केली. भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.

चार वर्षापूर्वी ते रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी दास्ताने यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणीदरम्यान त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. उपचार सुरू असतानाच अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद