दापोली  

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दापोली पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्या संशयितास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाजपंढरी येथील मासेविक्री करणार्‍या एका 30 वर्षीय तरुणीवर संशयित विशाल हरिश्‍चंद्र चोगले याने लग्नाचे आमिष दाखवून 6 मार्च रोजी दापोली येथील मच्छीमार्केटजवळील एका लॉजमध्ये तसेच 6 व 7 मार्च रोजी रात्री 10 ते 12 वाजण्याच्या मुदतीत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन संशयित विशाल चोगले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.