रत्नागिरी
चिपळूण । प्रतिनिधी ।
अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियायांच्या वतीने 21 व 22 फेब्रुवारी रोजी पंजाब मधील चंदीगड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मैदानी क्रॉस कंट्री स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उत्कृष्ट खेळाडू साक्षी संजय जड्याळ हिची महाराष्ट्र राज्य थलेटिक्स असोसिएशनच्यावतीने निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी या विद्यार्थिनीच्या माध्यमातून सह्याद्रीला प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींच्या गटात साक्षी जड्याळ सहभागी होणार असून तिच्या या कार्याची दखल घेऊन सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी तिचा नुकताच सन्मान केला आहे व या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहकार्य सुद्धा केले आहे.क्रीडा क्षेत्राबद्दल आपुलकी असणार्या चिपळूण संगमेश्वरच्या आमदारांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी केलेले हे सहकार्य नक्कीच वाखानण्याजोगी आहे असे मत साक्षीच्या आईने सन्मान प्रसंगी व्यक्त केले. साक्षी जड्याळ होतकरू, कष्टाळू व नम्र खेळाडू असून विद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचे काम तिने आपल्या कामगिरीने केले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्या मदतीसाठी सह्याद्री नेहमीच पाठीशी असेल अशी ग्वाही शेखर निकम यांनी दिली. व या स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. उदयराज कळंबे, श्री. अमृत कडगावे व रोहित गमरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.