चिपळूण,

तालुका मुस्लिम समाजाने कामथे उपजिल्हा रुग्णालयाचा लूक पूर्णपणे बदलला आहे. येथील तीन वॉर्ड सुसज्ज करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आयसीयुही मुस्लिम समाजाने उपलब्ध करून दिले आहेत. आज या तीन वॉर्डचे आणि आयसीयू यंत्रणेचे लोकार्पण सर्व पक्षातील नेतेमंडळी व प्रशासनाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी सर्वच पक्षातील नेत्यांनी चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने आरोग्यसेवेसाठी दिलेल्या कार्याचे कौतुक केले.

लोकार्पण सोहळ्याला आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष इब्राहीम दलवाई, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा, इब्राहिम वांगडे, सलीम कासकर, चौगुले, यासिन दळवी, प्रांताधिकारी जयराज सूर्यवंशी, तहसीलदार प्रवीण पवार, पोलीस निरीक्षक पोळ, सभापती धनश्री शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह सर्व पक्षांचे प्रतिनिधी, नगरसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भास्कर जाधव यांनी मुस्लीम समाजाच्या सेवा कार्याचे कौतुक केले. यापूर्वी मुस्लिम समाजाने मृतदेह काही दिवस ठेवायची वेळ आली तर त्यासाठी लागणारी अत्याधुनिक शवपेटी उपलब्ध केली आहे.

आता कामथे रुग्णालयाचा कायापालट केला आहे. मुस्लिम समाजाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कोरोनाचे संकट जगभर आहे. या संकटाला सामोरे जाण्याची मनाची तयारी ठेवा, असे आवाहन आ. जाधव यांनी केले. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना घाबरून न जाता ही सेवेची संधी आहे, असे समजून काम करा, असे सांगत सीमेवर सैनिक ज्याप्रमाणे लढतो त्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी या महामारीत लढत आहेत, अशा शब्दात त्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.