संगमेश्‍वर  

संगमेश्‍वर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ संभाजीनगरकडे जाणाऱया मार्गावरील फणसाचे झाड 33 के.व्ही विद्युतभारीत लाईनवर पडल्याने तीन पोल महामार्गावर कोसळले. विद्युतभारीत लाईन महामार्गावर पसरल्याने सुमारे 1 तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, लोंखडी पोल कार व रिक्षावर पडल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11.45वा दरम्याने घडली.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वरजवळच्या संभाजीनगरकडे जाण्यासाठी पाय वाट आहे. या पाय वाटेवर जुनाट फणसाचे झाड होते. तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड उन्मळून पडले. हे झाड महामार्गावरुन जाणाऱया 33 के.व्ही लाईनवर कोसळले. त्यामुळे या ताणामुळे महामार्गावरील सलग तीन पोल तुटून पडले. त्यामुळे लाईन महामार्गावर पसरली. त्यामुळे खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. संगमेश्‍वरचे विद्युत कर्मचारी, पोलीस व ग्रामस्थांनी सुमारे तासाभरात या वायर रस्त्यावरून दूर करून वाहतुक पुर्ववत केली. संगमेश्‍वर शहर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे लॉक डाऊनच्या दरम्याने घरी असलेल्यांना आणखीन त्रास सहन करावा लागत आहे.