रत्नागिरी  

मंगळवारी सकाळपासूनच जिल्हयात जोरदार वा-यासह धुवाँधार पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे सर्वच नदयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंधरामाड येथील बंधारा उधाणामुळे आणखी उध्वस्त झाला असून नारळाची झाडे उन्मळून पडली आहे. शिळ धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार झाले. शहरासह अनेक ठिकाणी निकृष्ट गटारांमुळे रस्त्यांना तळयाचे स्वरूप आले होते. दरम्यान, हवामान विभागाने 24 तासा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शिळ धरण मुसळधार पावसाने ओव्हर फ्लो झाले आहे. तुडुंब भरलेल्या या धरणाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणावर पाणी वाहत असून त्याला धबधब्याचे स्वरूप आले आहे. काजळी नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसु लागले आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास हरचिरी, चांदेराईत पुराचा धोका आहे.समुद्राला आलेल्या उधाणामुळे रत्नागिरी शहरानजिक असलेल्या मिऱया पंधरामाड येथे धुपप्रतिबंधक बंधाऱयाला पुन्हा एकदा तडाखा बसला आहे. उधाणामुळे समुद्राच्या अजस्र लाटा किनाऱयांवर धडकत आहेत.  मंगळवारी लाटांच्या तडाख्याने मोरेवाडी येथे राहणाऱया सावंत यांच्या तेथील नारळाच्या बागेचे नुकसान झाले आहे. काही झाडे उखडून पडली आहेत.

बधा-याला भगदाड पडल्याने लाटांचे पाणी घराच्या परिसरात येऊ लागले आहे. बंधाऱयाचे दगड लाटांनी गिळंकृत केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास पंधरामाड परिसरात मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. काळबादेवी, साखरतर, गावखडी, आरे, नेवरे, गणपतीपुळे जयगड आदी किनारपट्टी भागांमध्ये मोठमोठया लाटा आदळत होत्या. भरतीच्या पाण्याने काही ठिकाणी रहीवासी भागात प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये धडकी भरली आहे.

मुसळधार पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी माती आल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक रस्त्यांची पहिल्याच पावसात चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी गटारे तुंबण्याचे प्रकार समोर येत असून त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. काही ठिकाणी घरांमध्येही पाणी घुसण्याचे प्रकार घडले.लॉकडाऊमुळे अगोदरच सुनसान झालेल्या जिल्हयात मंगळवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने आणखीनच शांतता दिसत होती. बहुतांश रस्त्ये निर्मनुष्य होते. मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत जिल्हयात 128.40 मिमि इतक्या पावसाची नोंद झाली.

 मुसळधार पावसाने नदयांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री सोनवी, मुचकुंदी, बावनदी या नदयांची पातळी इशारा पातळीच्या आसपास पोहचली आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास या ठिकाणी पुराची शक्यता आहे. रत्नागिरीतील हरचिरी, चांदेराई, काजरघाटी, पोमेंडी खुर्द, सोमेश्‍वर भागात काजळी नदीला येणाऱया पुराचा तेथील वस्तीला दरवर्षी बसतो. त्यामुळे आताही कोसळणाऱया पावसामुळे या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लगत राहणाऱया नागरिकांना सतर्क करण्यात आलेले आहे. पोमेंडी येथे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लगतच्या शेती व बागायतींमध्ये पूराचे पाणी व्यापल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.

 

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!