रत्नागिरी 

जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मागील चार दिवसांचा विचार करता किमान रोज 20 नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढत आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांचा इतिहासदेखील जिल्ह्याबाहेरील प्रवासाचा आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण, सध्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता रत्नागिरी शहराजवळील कुवारबांव येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुवारबांव येथील सामाजिक न्याय भवन येथे हे सेंटर उभारले जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रुग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येतील, पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे, अशा रुग्णांना या नवीन कोविड केअर सेंटर दाखल केले जाणार आहे. या नव्या कोविड रुग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून, चार स्टाफ नर्सदेखील नियुक्त केल्या आहेत. शिवाय, अन्य स्टाफदेखील तात्काळ दिला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांवर उपचार करणे सोपे होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी 287 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा विचार करता एक महिन्यापूर्वी म्हणजेच 1 मे रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा सात होता. या सर्वांनी कोरोनावर मात केली होती. पण, त्यानंतर मात्र कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत गेला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 287 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आढळून आलेले बहुतांश रुग्ण हे जिल्ह्याबाहेरून आलेले आहेत. आजघडीला जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या ही एक लाखाच्या पार गेली आहे, तर 90 हजारपेक्षा जास्त रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत, तर 186 जण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला, तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....