मसुरे  

 मुलीच्या लग्नाची पत्रिका देऊन माघारी मुंबईला परतत असताना चिपळूण कोंडमळा येथे झालेल्या अपघातात जगदीश बाळकृष्ण मसुरकर (61) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाती मृत्यूची बातमी शुक्रवारी सकाळी खाजणवाडी येथे पोहोचताच शोककळा पसरली.

मसुरकर कुटुंबीय नोकरीनिमित्त मालाड-मुंबईला असतात. आपल्या मुलीच्या 9 मे 2020 रोजी असलेल्या लग्नाची पत्रिका गावच्या घरी तसेच देवालयात ठेवण्यासाठी जगदीश मसुरकर हे पत्नी विद्या, मुलगा अभिषेक व मुलगी श्रद्धा यांच्यासह बलेनो कारने मंगळवारी गावी खाजणवाडी येथे आले होते. लग्नपत्रिका देऊन ते गुरुवारी सकाळी मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण-कोंडमळा येथे हॉटेल रसोईसमोर त्यांच्या कारला समोरून येणाऱया ब्रीझा कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जगदीश मसुरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह चालक नीलेश गडकरी हे जखमी झाले आहेत. तर ब्रीझा कारमधील चालक संदीप शिंदे, वैशाली काकडे, अरुण शिंदे यांना अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मृत्यू झालेल्या जगदीश मसुरकर यांच्यावर मुंबई येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मर्डे उपसरपंच राजेश गावकर यांचे ते चुलत भाऊ होत.

अवश्य वाचा