राजस्थान सरकारच्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात झालेल्या टोळधाडीच्या हल्ल्यात राजस्थानमध्ये 1.49 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं तर गुजरातमध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची पिकं टोळधाडीच्या भक्ष्यस्थानी पडली. तीन महिन्यांपूर्वी आलेल्या अशा टोळधाडीची तीव्रता तर इतकी प्रचंड होती की केंद्राला त्वरित हालचाल करून हे कीटक नष्ट करण्यासाठी विशेष पथकं रवाना करावी लागली.

पंजाब प्रांतातल्या टोळधाडीच्या हल्ल्यानंतर दोन फेब्रुवारीला पाकिस्तानने ही राष्ट्रीय आपत्ती घोषीत करून आणीबाणीही जाहीर केली. पण सिंध प्रांतात टोळधाडीची पैदास रोखण्याकडे पाकिस्ताने मुद्दाम दुर्लक्ष केलं आणि या टोळधाडीने सीमारेषा ओलांडून भारतीय प्रदेशात घुसखोरी केल्यामुळे राजस्थान आणि गुजरातमधल्या शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान झालं, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. पंजाब आणि हरयाणामध्येही टोळधाडीच्या हल्ल्याचा इशारा देण्यात आला असताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 28 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या प्रश्‍नाच्या तीव्रतेची कल्पना दिली. आता जेमेतेम चार महिन्यांच्या अवकाशानंतर पुन्हा एकवार मोठी टोळधाड अवतरली. ती करू शकत असलेलं प्रचंड नुकसान लक्षात घेता कोरोनाचं महासंकट पेलत असतानाच या संकटाकडे अत्यंत गांभिर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली. राजस्थान आणि इतर सीमावर्ती राज्यांमधल्या शेतकर्‍यांसाठी तसंच प्रशासनासाठी तर ही ङ्गइकडे आड, तिकडे विहीरफ अशी परिस्थिती बनली आहे.