रायगड
राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील क्रीडा विभागाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीला केदार यांच्यासह क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिषठ पदाधिकारी उपस्थित होते. केदार म्हणाले की, नोकरीत प्रमाणपत्राचा लाभ घेताना प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील. राज्यात यापुढे बोगस प्रमाणपत्र देण्याचे तसेच ते मागण्याचे धाडस कुणी करणार नाही, अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे.
राज्यात उभारण्यात येणार्या क्रीडा संकुलांसाठी निधी वितरित करण्यात आला असून त्याबाबतची कामे तातडीने सुरू करावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. ते म्हणाले की, जागेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत. निधी वितरित झाल्यानंतर तो खर्च करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत याकडे क्रीडा अधिकार्यांनी लक्ष द्यावे. निधी कमी पडत असल्यास, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत.