अलिबाग 

रायगड जिल्ह्यावरील एकामागोमाग उभे राहणारे संकट थांबण्याचे नावच घेत नसल्याने रायगडकर हतबल झाला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर बेरोजगारीच्या खाईत सापडतो ना सापडतो तोच निसर्ग चक्रीवादळाने पुरते उध्वस्त केले असताना आता पुन्हा अतिवृष्टीने झोडपल्यानंतर त्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे. त्यामुळे भाताचे पिक संकटात आले आहे. निसर्ग चक्रीवादळातील बागायतदारांचे पुनवर्सन कागदावरच असून अजूनही वाडयांची पुरती साफसफाई देखील झालेली नाही.

अतिवृष्टी आणि निसर्ग वादळाचा दुहेरी फटका कोकणातील शेतीला बसला. वादळामुळे नारळ, सुपारी, आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले. तर अतिवृष्टीमुळे हळव्या भाताचे पीक संकटात आले आहे.  जून महिन्याच्या सुरुवातीला निसर्ग वादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. नारळ आणि सुपारीची लाखो झाडे उन्मळून पडली. शासनाने आपद्ग्रस्तांना मदत जाहीर केली. काजू आणि आंबा पिकांसाठी योजना लागू केल्या मात्र या योजनांची अंमलबजावणी मार्गी लागू शकलेली नाही.

रायगड जिल्ह्यात 1 लाख 24 हजार हेक्टर खरिपाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी 1 लाख हेक्टरवर यंदा भात पिकाची तर 10 हजार हेक्टरवर नागली पिकाची लागवड करण्यात आली आहे. जून आणि जुल महिन्यात पावसाने ओढ  दिली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला, त्यामुळे पीक जोमाने आले होते. सप्टेंबर महिन्यात पनवेल, कर्जत, खालापूर, रोहा, तळा येथील शेतीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सध्या हळव्या जातीचे भात दाणे भरण्याच्या ते काढणीच्या अवस्थेत आहे. तर गरवे आणि नीमगरव्या जातीची भातशेती फुलण्याच्या अवस्थेत आहे. पीकपरिस्थिती चांगली असल्यामुळे शेतकरी आनंदात होता, परंतु आठवडाभर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भाताचे नुकसान झाले.

जूनमध्ये झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक बागायतदारांना अजूनही नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. तर आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागांचे पुनरुज्जीवन योजना कागदावरच राहिली असल्याचे दिसून येत आहे.  कृषी विभागाने नव्या पुनर्गठीत रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जोर लावला आहे. यामध्ये क्षेत्राचा निकष वगळून प्रथमच झाडनिहाय निकषाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष बाधित क्षेत्रापैकी 50 टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्र पुनर्लागवडीखाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये नारळ, सुपारीचे संपूर्ण क्षेत्र तसेच आंबा काजूच्या उन्मळून पडलेल्या झाडांचा समावेश होणार आहे. मात्र एवढया मोठया प्रमाणात नारळ सुपारी रोपे उपलब्ध नाहीत. आंबा काजूच्या बागांमध्ये आवश्यक साफसफाई करण्यास झालेला विलंब यामुळे अनेक बागांचे पुनरुज्जीवन रखडलेले आहे.

अवश्य वाचा