अलिबाग 

निसर्ग चक्रीवादळानंतर होत असलेल्या नुकसान भरपाई वाटपात पक्षपात केला जात असल्याच्या आरोप-प्रत्यारोपावरुन महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे पक्ष असणार्‍या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रायगड जिल्ह्यात वाढती धुसफूस दिसून येत असल्याने चर्चेला जोरदार उधाण आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्योराप करण्यास सुुरुवात केल्याने ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

आदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यापासून जिल्ह्यातील शिवसेना अस्वस्थ होती. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळींसह तीनही आमदारांनी एकत्र येत याविरोधात पक्षनेतृत्वापर्यंत आपले गार्‍हाणे मांडण्याचे प्रयत्नदेखील केले होते. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांना चांगलीच समज देत शांत केले होते. त्यानंतर तर थेट पालकमंत्रीपदावर आदिती तटकरे यांची वर्णी लावत जिल्हा शिवसेनेला पुन्हा एकदा डावलण्याचा राजकीय डाव खेळला गेल्याने मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढीस लागला होता. पण, त्यांना न जुमानता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा आणखी एक खाते बहाल केल्याने शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधाला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या गेल्या. त्यामुळे आमदारांसोबत मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील राजकारणावर शिवसेनेतील राजकीय पदाधिकारी मात्र अस्वस्थच होते. प्रत्येकवेळी बाजूला टाकले जात असल्याने दिवसेंदिवस ही अस्वस्थता वाढतच होती. त्यात चक्रीवादळाच्या संकटानंतर केल्या जाणार्‍या मदत वाटपातील राजकीय भेदभावाने वाट करुन दिली. दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी थेट पालकमंत्री आणि खासदारांना आव्हान देत पक्षपात केल्याचा आरोपच केला. तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी आत्यावश्यक वस्तूंचे दोन हजार किट जिल्ह्याबाहेरुन म्हसळा तालुक्यासाठी आले होते. मात्र, हे किट तालुक्यातील सर्व गरजूंना मिळणे अपेक्षित असतानाच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनावर दबाव टाकून या सर्व किटचे वाटप फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना केले असल्याचा आरोप नवगणे यांनी केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या आरोपामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले खा. सुनील तटकरे यांनीदेखील त्यांच्यावर टीका करत किरकोळ माणसाने केलेल्या विधानाला मी उत्तरे देत नाही, अशी प्रतिक्रिया दिलीच. भरदुपारी बारा वाजता उठणार्‍यांना जनतेच्या भावना काय कळणार? असा वैयक्तिक टोलाही लगावल्याने शिवसेनेत संताप व्यक्त केला जात आहे.

खा. तटकरे यांनी यावेळी आपली बाजू मांडताना आम्ही कधी पक्षीय भेदभाव केला नाही की कुणा अधिकार्‍यांवर दबाव आणला नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामे करावीत. राज्य शासन हे महाविकास आघाडीचे आहे. आम्ही सेनेच्या आमदारांना सोबत घेऊन कामे करतो. पण, ज्यांना राजकारण कळत नाही, त्यांनी उगाचच टीका करु नये. कोरोनाच्या महामारीत तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणातील जनता पूर्णपणे संकटात सापडली आहे आणि अशा प्रसंगात कुणी राजकारण करू नये. असे बजावतानाच आम्ही महाड-पोलादपूरचे, अलिबाग तसेच  कर्जतच्या आमदारांना सोबत घेऊन काम करीत असल्याचे सांगतानाच नवगणे यांचा समाचार घेताना ज्यांना कमी ज्ञान आहे, त्यांना आम्ही कसे विचारणार? अशा शब्दात खिल्लीही उडवली. त्यामुळे जिल्हा संघटनेच्या जिल्हाप्रमुखावर टीका केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याने त्याची चर्चा जिल्ह्याबरोबरच राज्यातदेखील होत आहे.