अलिबाग

वादळग्रस्तांना  जे पॅकेज जाहीर केलेले आहे,त्यात सरकारने सुधारणा करावी,असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
   
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी  अलिबाग तालुक्यातील नागाव, बागमळा, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी निरुपणाकर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.   पाहणीदरम्यान, फडणवीस यांनी बागायतदार शेतकर्‍यांकडून माहितीही घेतली. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.निरंजन ठाकूर हे देखील उपस्थित होते.

राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणवासीयांना दिलेली मदत अत्यंत तोकडी आहे. त्यातच नऊ दिवस उलटूनही सरकारकडून कुणालाही कोणतीही मदत मिळाली नाही,   चक्रीवादळामुळे कोकणातील झालेलं नुकसान खूप मोठं असून सरकारने दिलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करावी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
 
फडणवीस यांनी श्रीवर्धन तालुक्यातील  निसर्ग चक्रीवादळाने तडाखा बसलेल्या गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील निवारा केंद्रांना भेटी देऊन स्थानिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टीकास्त्र सोडले.

राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर केली आहे. पिकांचं नुकसान झाल्यानंतर अशा प्रकारची मदत आपण करतो. पण पिकांचं नुकसान पुढच्या वर्षी भरून निघत असतं. पण या ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. आता पुन्हा झाडे लावल्यानंतर दहा वर्षानंतर शेतकर्‍यांना त्यातून नफा मिळणार आहे. म्हणजे नऊ वर्ष या शेतकर्‍यांना नुकसान सोसावं लागणार असल्याने हेक्टरी मदतीचे निकष सरकारने बदलले पाहिजे. सरकारने पॅकेजमध्ये सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. ती हटवणे गरजेचे असून रोजगार हमी योजना किंवा तत्सम योजनेतून ही झाडे काढली पाहिजेत, असंही ते म्हणाले.  नऊ दिवसानंतरही कोकणातील वीज पुरवठा सुरू झालेला नाही. महाराष्ट्रभरातून टीम तयार करून सरकारने वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच पिण्याच्या पाणी पुरविण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली.    या पाहणी दौर्‍याचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.