Wednesday, December 02, 2020 | 11:23 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

पाली सरपंचपदाची प्रथमच आदिवासी समाजाला संधी
रायगड
21-Nov-2020 05:16 PM

रायगड

पाली / बेणसे 

सुधागड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पाली ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सरपंचपदासाठी आदिवासी कातकरी समाजातील सदस्याला संधी मिळाली आहे. शेकाप -  राष्ट्रवादी काँगे्रसचे अनंत भुर्‍या वालेकर यांची पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्तगुरु सरनाईक व सहाय्यक म्हणून  ग्रामसेवक राहुल कांबळे यांनी काम पाहिले. सरपंचपदी अनंत वालेकर यांची बिनविरोध निवड होताच आदिवासी कातकरी समाज बांधव व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले होते. या रिक्त जागेवर उपसरपंच विजय मराठे यांची प्रभारी सरपंच म्हणून नेमणूक करण्यात आली होती.  

सप्टेंबर 2018 मध्ये गणेश बालके हे सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणूक राखीव प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र त्यांनी निवडून आल्यापासून विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्यांचे सरपंच पद रद्द केले. अशावेळी तत्कालीन उपसरपंच असलेल्या विजय मराठे यांच्याकडे प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. दीड महिन्याने सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अनंत भुर्‍या वालेकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. झाप गावचे रहिवासी असलेले अनंत वालेकर हे वार्ड क्रमांक दोनमधून निवडून आले होते. पाली ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच आदिवासी कातकरी समाजाला सरपंचपदाचा बहुमान मिळाला असल्याने आदिवासी समाजबांधवांनी जल्लोष साजरा करीत आघाडीचे आभार मानले.

नवनिर्वाचित सरपंच वालेकर यांनी यावेळी सांगीतले की, संविधाननिर्माते  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आज आदिवासी कातकरी समाजातील व्यक्तीला सामाजिक व राजकीय दृष्टया प्रतिष्ठेचे स्थान मिळत आहे. सरपंचपदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेल. पाली ग्रामपंचायतीअंतर्गत येणार्‍या गाव व  वाड्यावस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे.

पाली नगरपंचायत अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु दरम्यानच्या काळात सरपंच पद रिक्त असल्याने दीड महिन्यानंतर सरपंच म्हणून आघाडीच्या अनंत वालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वालेकर हे आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने सरपंचपदाला योग्य तो न्याय देतील, असा विश्‍वास सुरेश खैरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या नेत्या गिता पालरेचा यांनीही नवनिर्वाचित सरपंच वालेकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेंद्र राऊत, माजी सरपंच गणेश बालके, उपसरपंच विजय मराठे, प्रकाश कारखानीस, महेश खंडागळे, योगेश शहा, आरिफ मणियार, अभिजित चांदोरकर, सागर मिसाळ, संजोग शेठ, सुधीर साखरले, गजानन शिंदे, ग्रा.पं. सदस्य चंद्रगुप्त भालेराव, शुभांगी मिसाळ, सुजाता वडके, दीपाली ठोंबरे आदींसह  शेकाप व  राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top