पेण  

पेणमध्ये गेल्या आठवडयात शे.का.प. व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला जोरदार धक्का दिला. शहरातील व ग्रामीण भागातील भाजपचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यातच पेण नगरपालिकेमध्ये चाललेल्या हुकुमशाही व घराणेशाहीला कंटाळलेले नगरसेवक वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत आहेत.

गेल्या 18 तारखेला होणार असणारी पेण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सत्ताधारी नगरसेवकांतील आपापसातील वादामुळे तातडीने रद्द करावी लागली. एकंदरीत पेण शहरात भाजपाचे कार्ड वापरून सत्ता चालवणार्‍या काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून घरातच यादवीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक शे.का.पक्षाच्या व राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. पेण नगरपालिका ही पाटील कुटुंबीयांची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे वागत असल्याने व सत्ताधारी नगरसेवकांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान मिळत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक घराणेशाहीला कंटाळले आहेत. त्यामुळे एक माजी उपनगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या संपर्कात असून दोन सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. अपक्ष नगरसेवकांपैकी दिपक गुरव हे राष्ट्रवादी समर्थक आहेत. तर तेजस्वी नेने या सध्या सत्ताधारी पक्षाच्या सभापती असल्या तरी त्यांचे पती मंगेश नेने आणि खाजदार सुनिल तटकरे यांचे स्नेहसंबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे पेण नगरपालिकेत सत्तेचा खांदेपालटाची शक्यता आहे.

सद्यस्थितीत सत्ताधारी नगरसेवकांची अवस्था फक्त बेरजे पुरतीच गृहीत धरली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या नातेवाईकांनी शेकाप व राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास पेणकरांना एक राजकीय नाट्य पहायला मिळेल.

 

 

अवश्य वाचा