मुरुड जंजिरा 

राज्य शासनाकडून वादळग्रस्तांना आतापर्यंत सर्वोत्तम मदत मिळाली असून भविष्यात त्या रकमेत वाढ करण्याचे प्रयोजन आहे. वादळात ज्यांच्या घराचे छप्पर उडाले आहे व ज्यांची नारळ सुपारींच्या झाडांचे नुकसान झाले आहे, अशांना राज्य शासनाकडून पूर्वीच्या सरकारपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करीत असून मीसुद्धा केंद्र सरकारकडून चांगला निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगीतले.

निसर्ग चक्रीवादळग्रस्त मुरुडला भेट दिल्यानंतर त्यांनी येथील माध्यमिक हायस्कूलला राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमार्फत पत्र्यांचे वाटप केले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खा. अमोल कोल्हे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिक खतीब, सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे, मुख्याध्यापक चिंतामणी जोशी,  स्मिता खेडेकर, सुबोध महाडिक, सुभाष महाडिक, अ‍ॅड. इस्माईल घोले आदी उपस्थीत होते.

यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, वादळग्रस्तांन जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी  खा. तटकरे यांनी खूप मेहनत शासकीय अध्यदेशाचा अभ्यास करून त्यात योग्य तो बदल घडवून आणला. त्यामुळेच नुकसंग्रस्तना चांगली रक्कम प्राप्त होणार आहे.

यावेळी खा. तटकरे यांनी सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत सुपारी पिकाचा समावेश होणार आहे. त्यामुळे या योजनेत बसणारे सर्व फायदे शेतकर्‍यांना मिळणार आहेत. बगायतदारांचे जास्त नुकसान झाले याची राज्य शासनाला पूर्ण कल्पना आहे. यासाठीच शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा करून बागायतदारांना जास्त रक्कम मिळण्यासाठी लवकरच शासकीय अध्यदेश निघणार आहे.

यावेळी मुरुड तालुक्यातील छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव, अंजुमन हायस्कूल मुरुड व सर एस. ए. हायस्कूल मुरुड या संस्थांना पत्रे वाटप करण्यात आले.