अलिबाग 

 जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती अलिबागच्या वतीने सोशल डिस्टन्स राखत तसेच तोंडाला मास्क लावत जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन सोहळा रविवारी (ता.9) तोरणपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अलिबाग तालुक्यातील कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायत हद्दीतील तोरणपाडा आदिवासी वाडीवर या सोहळ्याचे आयोजन साध्या पद्धतीने करण्यात आले होते. या सोहळ्याला अलिबाग व पेण तालुक्यातील मोजकेच प्रतिनिधी, उपस्थित मान्यवर तसेच स्थानिक आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलिबाग तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य धर्मा लोभी, तर प्रमुख अतिथी म्हणून आपत्ती तज्ञ जयपाल पाटील उपस्थित होते. याशिवाय सुरक्षा मित्र विकास रणदिवे, ठाकूर समाजाचे तालुका अध्यक्ष पिंगळा, होंडावाडी ग्रामपंचायत सदस्य चांगू लेंडी, आदिम आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश नाईक, अलिबाग तालुका कातकरी समाज संघटनेचे मुकेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते धर्मा पिंगळा, रोहिदास नाईक, चांगू मेंगाळ, महेश नाईक, हशा पारधी, महादेव मेंगाळ, गुलाब नाईक, रेखा वाघमारे, संगीता ताई, संवाद लेखक, दिग्दर्शक सुभाष इंदुलकर, कुरकुंडी-कोलटेंभी उपसरपंच राजू प्रभाळे, आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा सचिव गंगाराम मेंगाळ, पेणचे हरिश्‍चंद्र पवार, अलिबाग नगरपालिकेचे वरिष्ठ लिपीक रमेश धरणीये, रामकृष्ण नाईक, गणेश हिलम, तुकाराम नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.

आपत्ती तज्ञ जयपाल पाटील यांनी यावेळी आदिवासींना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करताना आदिवासींना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करीत कोरोना काळात नियमाचे पालन करण्याबाबत आवाहन केले. त्याचबरोबर आदिवासी युवक-युवतींनी उच्च शिक्षण घेत शासकीय सेवेबरोबर सैन्य दलात सहभागी होण्याचेही आवाहन केले. अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य धर्मा लोभी यांनी आपापसातील मतभेद मिटवीत एकत्र येण्याचे आवाहन केले. तर रायगड जिल्हा कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष भगवान नाईक यांनी आदिवासींच्या एकूण 47 जाती असून, पैकी कातकरी आणि ठाकूर या दोन जाती असल्याचे सांगतानाच समाजातील काही मुले आणि मुली शिक्षीत झाल्या असल्याने त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शासनाने लक्ष देण्यास सांगितले. कोरोना काळात प्रशासनाच्या नियमाचे पालन कातकरी आणि ठाकूर समाजाने केल्याने एकालाही कोरोनाचा प्रादूर्भाव झाला नसल्याचे सांगितले. रायगड जिल्हा ठाकूर समाजाचे सचिव गंगाराम मेंगाळ यांनी कोळघर येथे आदिवासी समाजासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून घेतल्याचे सांगत, जातीचे दाखले, सातबारावर आदिवासींची नावे लावून घेणे, आदिवासी वाड्यांपर्यत नळाचे पाणी नेणे आदी प्रश्‍न मार्गी लावल्याचे सांगितले. याप्रसंगी अरविंद पाटील तसेच सागर थळे यांनी विविध गीते सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. अलिबाग तालुका कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष दत्ता नाईक यांनी प्रास्ताविक केले, भगवान नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर संतोष वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद