अलिबाग 

रायगडसह मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत  29 जून ते 1 जुलै या दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात 29 जून रोजी किनारपट्टी परिसरात गडगडाटीसह वादळ आणि मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर 30 जून रोजी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह  पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे  1 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात किनारपट्टी परिसरात जागी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे.

मुंबईतही सावधानतेचा इशारा

  जूनमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. सुरूवातील मुंबईत पावसानं हजेरी लावली, मात्र एका आठवड्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या पावसाची लागली आहे. मुंबईकरांची ही प्रतिक्षा लवकरच संपण्याची चिन्ह आहेत. पुढील आठवड्यात पाऊस मुंबईत परतणार असून, 2 ते 4 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं असा अंदाज व्यक्त केला आहे.

  हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसळीकर यांनीही ट्विट करून पावसाची माहिती दिली आहे. मुंबईसह पश्‍चिम किनारपट्टी व उत्तर कोकण भागात 2 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची अंदाज आहे. मुंबई व उपनगरात 2 ते 4 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसळीकर यांनी म्हटलं आहे.

पुणे वेधशाळेनंही  (29 जून) गोव्यासह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस