नेरळ  

स्वातंत्र्य लढ्यात चले जाव च्या आंदोलनात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे मानीवली गावचे गोमाजी पाटील यांच्या यांचा पुत्र हिराजी हे देखील हुतात्मे झाले. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराची अवस्था दयनीय आहे, त्यामुळे ते घर कोसळू शकते. ज्या घरात हुतात्मा हिराजी पाटील यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्या घराशी निगडित अनंत आठवणी आहेत. मात्र शासनाकडून या घराला स्मारकाचा दर्जा दिला नाही आणि त्यामुळे घर मोडकळीस येऊ नये यासाठी घराची दुरुस्ती करण्याचा निर्णय त्यांची नात सून अनुसया गोपाळ जामघरे यांनी घेतला आहे. दरम्यान, कोसळून नष्ट होणार असलेल्या घराचे नव्या घरात रूपांतर करून सरकार स्मारक करणार नसेल तर आपण करू असा निर्धार जामघरे यांनी केला आहे.

कर्जत तालुक्यातील मानीवली गावातील गोमाजी पाटील हे आपला एकुलता एक मुलगा हिराजी यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते.दोन जानेवारी 1943 ला मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे फितुरीने घात होऊन भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना वीरमरण प्राप्त झाले होते.त्याच दिवशी गोमाजी पाटील यांनाही अटक झाली होती,1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गोमाजी पाटील सुटले आणि पत्नी ठकाबाई,सून जानकीबाई सह मानीवलीला काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होते.गोमाजी पाटील यांना आधार राहिला नसल्याने त्यांनी भविष्याचा विचार करून बिरदोले येथील दहा वर्षाच्या नातेवाईक मुलाला कायमचे ठेवण्यासाठी म्हणून आपल्याकडे आणले.1954 साली त्या मुलाचे म्हणजेच गोपाल जामघरे यांचे लग्न खाडेपाडा येथील अनुसया नावाच्या मुलीबरोबर लावून दिले. हे जामघरे दाम्पत्याने गोमाजी पाटील आणि जानकीबाई यांची सेवा केली.गोमाजी पाटील यांनी आपल्या मालकीची काही जमीन गोपाल जामघरे यांना बक्षिस पञ करून दिली होती.1961 साली गोमाजी आणि 1967 साली जानकीबाई यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी गोमाजी पाटील यांचे घर त्यांच्या पुतण्यानी पाडले.आणि अनुसया बाई यांनी पतीच्या निधनानंतर पडीक गोठा बांधण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक पातळीवरून त्यांना विरोध झाला होता.

ज्या घरात हुतात्मा हिराजी पाटील यांचा जन्म झाला,जानकीबाई पाटील यांनी संसार केला होता.त्याच घरात आपण सून म्हणून प्रवेश करून क्रांतीवीर गोमाजी पाटील आणि जानकीबाई पाटील यांची सेवा केली,त्या घरात क्रांतिकारकांच्या अनंत आठवणी आहेत.त्यामुळे क्रांतिकारक गोमाजी पाटील यांच्या घराच्या ठिकाणी स्मारक उभारून पुढच्या पिढीसमोर एक देशभक्तीचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी वयाच्या 83 व्या वर्षी अनुसयाबाई जामघरे एकाकी लढत आहेत.मानीवली येथील हुतात्म्यांच्या आणि आपल्या पडीक घराची दुर्दशा झाल्याने त्या तेथे राहत नाहीत. त्या बदलापूर येथील आपल्या मुलीकडे राहात आहेत.देशप्रेमी नागरिक आपल्याला साथ देतील अशी अपेक्षा करीत त्या घराच्या जागी स्मारक उभारण्यासाठी लढा देत आहेत.याबाबत आझाद दस्त्याचे संशोधक गिरीश कंटे यांनी शासनाने त्यांचे घर हे स्मारक करायला हवे होते,पण शासनाने असे काही केले नाही आणि करण्याची वृत्ती दिसत नाही.त्यामुळे हुतात्मा हिराजी पाटील यांची कुटुंबीय घराची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तर त्यावेळी कोणी अडवणूक करू नये असे आवाहन ते करीत आहेत.

अवश्य वाचा