रोहा  

 ज्यांच्याकडे नवी पिढी घडविण्याचे महत्वाचे काम आहे, असा शिक्षक वर्ग मागील सहा महिन्यांपासून अनावधानानेच शाळांकडे फिरकत असल्याने शिक्षकांना शोधायचे तरी कुठे असा प्रश्‍न पालक, सरपंच व सदस्य आणि अधिकार्‍यांना पडला आहे.

अशैक्षणिक कामे शिक्षक वर्ग करणार नाही आणि कोरोनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शिकवणार पण नाही पण पगार मात्र पूर्ण घेणार, अशी शिक्षकांची मानसिकता दिसून येत आहे. कोरोना संकटाचा डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक,आरोग्यसेविका,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिपाई, पोलीस, महसूल व जि. प.चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, रुग्णवाहिका चालक, एसटी चालक, सफाई कर्मचारी यांच्यासह अनेकजण मागील सहा महिन्यांपासून सामना करत आहेत. अनेकांना कोरोनाशी लढताना संसर्ग झाला. काहींना आपले प्राण गमवावे लागले. तरीदेखील ही सर्व मंडळी आजही समोरील संकट दिसत असूनही धैर्याने कोरोना विरोधात लढत आहेत. मागील सहा महिन्यांत अपवाद वगळता शिक्षक कुठेच दिसून आलेले नाहीत. 

अनेक शिक्षक मार्च महिन्याच्या 20 तारखेपासून स्वतःच्या गावी निघून गेले होते. नंतर लॉकडाऊनच्या नावाखाली घरी राहून पगार घेतले. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नाही, पालकांकडे मोबाईल नाहीत यासारख्या विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना कोणतेही शिक्षण दिलेले नाही. जिल्ह्यातील किती शिक्षक त्यांच्या मुख्यालयात राहतात हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. स्वतःच्या हक्कांबाबत जागरुक असणार्‍या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्यात कोणते शिक्षण दिले याचा आढावा प्रत्येक सरपंच व सदस्य यांनी तसेच सर्व लोकप्रतिनिधीनी घेणे गरजेचे झाले आहे. शिक्षकांच्या आडमुठ्या वागणुकीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे.जिप शाळांमधील घटत्या पटसंख्येला शिक्षकवर्गच मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. राज्यातील काही शिक्षकांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काही जणांनी अभिनव उपक्रम राबविले असल्याचे दिसून येत असले तरी अशा शिक्षकांचे प्रमाण अतिशय अल्प आहे.

शिक्षकांच्या बेमुवर्त वागणुकीमुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना मुख्यालयात राहणे सक्तीचे करणे ,शिक्षक वेळेत शाळेत येतात आणि वेळेत जातात का वेळेपूर्वी जातात याकडे पालक,ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे असून मागील सहा महिन्यात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कोणता अभ्यासक्रम शिकवला याची माहिती घेणे आवश्यक झाले आहे.शिक्षकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी याची गरज दिसून येत आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त