अलिबाग 

कोरोना संक्रमन वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने उद्या बुधवारी मध्यरात्रीपासून संपुर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर बाजारपेठेत भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंंबड उडाल्यानंतर अलिबाग शहरातील व्यावसायिकांनी याचा गैरफायदा घेत दुप्पट ते तिप्पट भाव वाढ केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसून व्यावसायिक मात्र मालामाल झाले आहेत.

रायगडात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनही हतबल झाले आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून रायगड जिल्हा पुन्हा दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारपासूनच जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट, तर दुसरीकडे  जिल्ह्याला बसलेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यामुळे सर्वसामान्यांची प्रचंड हाल सुरु आहेत. परंतु, अशा परिस्थितीतही भाजी विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात दुपटीने-तिपटीने वाढ केली आहे. त्यामुळे या दोन दिवसात भाजी विक्रेते मालामाल झाल्याचे चित्र असून, सामान्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत.

रायगडात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, मृत्यू होण्याच्या प्रमााणातही वाढत होताना दिसत आहे. कोरोनाची ही साखळी तोडायची असेल, कोरोना हद्दपार करायचे असेल, तर गर्दी टाळणे हा कोरोनावरचा एकमेव प्रभावी उपाय आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाने जाणून घेत पुन्हा एकदा बुधवारी मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक लॉकडाऊन करण्याच्या घोषणेनंतर सर्वसामान्यांनी जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या गर्दीचा फायदा घेत अनेक व्यापार्‍यांनी सर्रास ग्राहकांची लूट सुरु केली आहे. त्यात भाजी विक्रेते चांगलाच भाव खाऊन गेले आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसमान्यांचे बजेटही वाढले आहे. त्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री बसली आहे. अचानक भाज्यांचे दर कडाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भरमसाठी दराने भाजीविक्री

 बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी दोन दिवसांपूर्वी 40-50 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो अचानक 140 ते 150 रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. तर, अन्य भाज्यांचीसुद्धा हीच अवस्था आहे. फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, भेडी, वांगी अशा सर्वच भाज्यांचे घाऊक व किरकोळ दर दुपटीने वाढले आहेत. विशेष म्हणजे अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे. 30 रुपयांची कोथिंबिरीची जुडी 80 रुपये झाल्याचे दिसून आले. तर इरत भाज्यांचेही भाव दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असतानाही नाइलाज म्हणून जीवनावश्यक असलेली भाजी पुढील दहा दिवस पुरेल एवढी खरेदी करताना नागरिक दिसून येत आहेत.

अर्थिक संकट कायम

लॉकडाऊनचा फायदा घेत विक्रेते हे ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप ग्राहाकांनी केला आहे. प्रत्येक भाजीचे दर दुप्पट तिप्पट झाल्याने ग्राहक हवालदिल झाल्याचे दिसत होते. आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही.. काहींचे पगारही वेळेत मिळालेले नाहीत. काहींना दोन-तीन महिन्यांचे पगारही झालेले नाहीत. काहींच्या नोकर्‍यादेखील गेल्या आहेत. अशी अवस्था असताना, आता भाज्यांच्या वाढत्या दरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने पुरते कंबरडे मोडलेले असतानाच, आता भाज्याही अचानक महागल्याने खायचे काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.

आधीचे भाज्यांचे दर आणि आता दोन दिवसांत वाढलेले दर यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून पुढे दहा दिवस लॉकडाऊन असल्याने त्याचा फायदा हे भाजी विक्रेते घेत असून, ग्राहकांची लूट करीत आहेत. संबंधित प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून ग्राहकांची होणारी लूट थांबवावी आणि लुटमार करणार्‍या भाजी विके्रत्यांवर कारवाई करावी.

- नेहा कवळे, नवगाव-थळ (गृहिणी)

 

अवश्य वाचा