Saturday, March 06, 2021 | 01:39 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अखेरचा अल्टीमेटम
रायगड
22-Feb-2021 07:26 PM

रायगड

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधून अखेरचा अल्टीमेटम दिला आहे. गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण राज्यात झपाट्याने वाढू लागले असताना लोक मात्र बेफिकिरीने वागत आहेत. सभा, समारंभ, राजकीय कार्यक्रम आता जोरात सुरु झाले असून, सर्व असलेले निर्बंध तोडले जात आहेत. सरकारने राजकीय दबावाला बळी पडून विविध बाबी सुरु केल्या, अगदी मुंबईतील लोकल सेवाही सुरु केली. परंतु त्याचे पडसाद आपल्याला लगेचच जाणवू लागले आहेत. मुंबईत व अन्य भागात कोरोनाचे रुग्ण लगेचच वाढू लागले आहेत. जर मुंबईत पूर्वीप्रमाणे लोकलने दररोज 80 लाख लोकांचा प्रवास सुरु झाला तर कोरोना किती झपाट्याने वाढेल त्याचा अंदाज न केलेलाच बरा. त्यामुळे राज्यात आठ दिवस वाट बघून पुन्हा लॉकडाऊन लादले जाईल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की, खबरदारीचे उपाय योजून लॉकडाऊनपासून दूर राहणे पसंत करणार? असा मुख्यमंत्र्याचा सवाल योग्यच आहे. विदर्भातील काही भागात तर खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हानिहाय लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील काही संवेदनाक्षम भागात पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन उठल्यावर लोक निर्धास्त झाले खरे, परंतु त्यांची ही बेफिकीरी आता रुग्णवाढीत रुपांतरीत होत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे हाल झाले, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, ज्यांच्या नोकर्‍या टिकल्या त्यांची पगार कपात झाली. रोजंदारीवर असलेल्या मजुरांचे तर सर्वाधिक हाल झाले. स्थलांतरीत मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो मैलांची पायपीट करावी लागली. परंतु त्याचे सरकारला काहीच सोयरेसुतक नाही. पंतप्रधानांनी सतत करोडो रुपये मदतीच्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात कोणाच्याच हातात ठोस मदत काही मिळाली नाही. पहिल्या तीन महिन्यानंतर सरकारने हळूहळू निर्बंध उठविण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे प्रदीर्घ काळ लॉकडाऊन काही सुरु ठेवता येणार नाही हे सरकारच्या लक्षात आले. त्यातून हळूहळू निर्बंध ढिले करीत सध्याची स्थिती आली आहे. गेल्या तीन महिन्यात राज्यातील व देशातीलही परिस्थिती समाधानकारकच होती. कोरोनाची रुग्णसंख्या घसरु लागली होती. त्याचबरोबर बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढली होती. कोरोनामुळे होणारे मृत्यूही आटोक्यात आले होते. हे सर्व सकारात्मक होत असताना सर्वांनीच कोरोना पुन्हा वाढणार नाही याची खबरदारी घेणे जरुरी होते. परंतु लोक ढिले पडले, लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागले. प्रशासनही कोरोना आता संपला या भरवशावर ढिले पडले. त्यामुळे ही बेफिकीरी जशी लोकांची वैयक्तिक आहे तशीच त्याला ढिले पडलेले प्रशासनही जबाबदार आहे. आपल्याकडे गेल्या काही महिन्यात धूमधडाक्यात लग्ने, समारंभ, राजकीय सभा सुरु झाल्या. जणू काही कोरोना आपल्याकडे नाही अशाच थाटात सगळीकडे गर्दी सुरु झाली. बाजारपेठा पुन्हा फुलू लागल्या. सरकारनेही फार झपाट्याने या सगळ्यासाठी ढिलाई देण्यास सुरुवात केली. पोलिसांना गेल्या वर्षात आलेला थकवा जनतेच्या पथ्यावर पडला. सरकारने लॉकडाऊन उठविताना यासंबंधी सर्वांना इशारा दिलाच होता. जर कोणी हात धुणे, अंतर पाळणे व मास्क वापरणे ही त्रिसुत्री वापरली नाही तर कोरोना पुन्हा आपल्या मानगुटीवर बसू शकतो. हे सरकारने वारंवार सांगूनही लोकांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यातच नवीन वर्षाच्या प्रारंभी लस आल्याने लोकांमध्ये आणखी ढिलाई आली. लस आल्यामुळे आपण सुरक्षित झालो अशी लोकांची समजूत झाली. परंतु ही लस शंभर टक्के आपल्याला मदतकारक ठरणार आहे असे नव्हे. लस ही एक आपल्याला मदतकारक निश्‍चितच ठरणार असली तरीही लसीची उपयुक्तता अजून सिद्ध व्हायची आहे. त्याचबरोबर आपल्यासारख्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशात सध्याची गती पाहता शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी किमान दीड-दोन वर्षे जातील असे दिसते. त्याचबरोबर लस घेतली तरी आपल्याला खबरदारीच्या उपाययोजना कराव्याच लागणार आहेत. लस घेतली म्हणजे आपण कोरोनामुक्त झालो असे नाही. अपवादात्मक स्थितीत काही जणांना लस घेतल्यावरही कोरोना झाल्याचे आढळले आहे. त्यावरुन या लसीचे सर्व प्रयोगच सुरु आहेत असेच म्हणावे लागेल. हे सर्व पाहता प्रत्येकाला खबरदारीचे उपाययोजना कराव्या लागणार आहेत. सरकारने त्यादृष्टीने आत्तापासूनच सुरु केलेल्या खबरदारीच्या उपाययोजना योग्यच आहेत. अनेकांनी दुसर्‍या मोठ्या लाटेचा अंदाजही व्यक्त केला आहे. परंतु ही लाट थोपविण्याचे काम प्रत्येकाच्याच हातात आहे. कोरोनाची पहिली लाट यापूर्वी आपण चांगल्या रितीने थोपवली आहे. कोरोना ज्यावेळी उच्चांकाला होता त्यावेळी स्थापन केलेली कोरोना रुग्णालये अजूनही सरकारने बंद केलेली नाहीत. जर दुसरी लाट आलीच तर त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येऊ शकतो. गेल्या वर्षात आपल्याकडील प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला कोरोनावर कशी मात करावयाची त्याचा एक उत्तम अंदाज आला आहे. त्यामुळे पुढील वेळी जर काही मोठी लाट आलीच तर आपल्याकडील सर्व यंत्रणा सज्ज असेल, मात्र तशी वेळ येऊ देता कामा नये. अर्थात हे सर्व आपल्याच हातात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्याचा इशारा गंभीरतेने घ्यावा व खबरदारी प्रत्येकाने बाळगावी. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top