रायगड
। भारत रांजणकर । अलिबाग ।
रायगड जिल्ह्यात कोरोना रुगणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मागील काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवतो आहे. जिल्हा मुख्य साठवण केंद्रातील लसीचा साठा पूर्णपणे संपला आहे. अनेक केंद्रावरील लसीकरण थांबलेलं आहे. ज्या केंद्रावर लस शिल्लक आहे तिथला साठा येत्या एक दोन दिवसात संपुष्टात येईल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात दररोज 500 ते 800 नवे रुग्ण सापडत आहेत. अॅक्टिव्ह रुगणांची संख्या 5 हजारच्या पुढे आहे. अशातच लस संपल्याने चिंतेत वाढ झालीय. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संपूर्ण राज्यभरात अशी स्थिती आहे. रायगड जिल्ह्यात लस उपलब्ध नाही. सोमवारपर्यंत लस उपलब्ध होईल.
रायगड जिल्ह्यात एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोविड लशीचा तुटवडा भासतो आहे. लशीअभावी ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यासाठी एक लाख पन्नास हजार वीस डोस (1 लाख 50 हजार 20 ) उपलब्ध झाले. 1 लाख 15 हजार 128 जणांना पहिला डोस देण्यात आला. तर 13 हजार 589 जणांचा दुसरा डोस पूर्ण झालाय. शहरी भागात ब-यापैकी लशीचा पुरवठा होत असला तरी ग्रामीण भागातील लोकांचे रजिस्ट्रेशन होवून देखील पुढील तारखा दिल्या जात आहेत. जिल्ह्यात 88 लसीकरण केंद्र उघडण्यात आली होती. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. सध्या 5 हजार 700 इतके कोरोनाचे अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. दररोज 500 ते 800 नवीन रूग्णांची भर पडते आहे. त्यामुळे चिंता वाढत चालली आहे.
जिल्हाभरात कोव्हिड लसीकरणाचा तुटवडा जाणवतो आहे. काही केंद्रांवर थोडया प्रमाणात लस उपलब्ध आहे. एक दोन दिवसात हाही साठा संपुष्टात येईल. संपूर्ण राज्यातच लसींचा तुटवडा असून येत्या सोमवारपर्यंत लसींचा पुरवठा होईल.
डॉ सुधाकर मोरे
जिल्हा आरोग्य अधिकारी