उरण  

न्हावा - शेवा सिलिंकच्या कामामुळे प्रकल्पबाधित झालेल्या कोळी बांधवांना अखेर नुकसान भरपाई देण्यास शासनाने सुरुवात केली असून त्यातील पहिल्या टप्प्याची रक्कम प्रकल्पबाधितांना मिळाली आहे.

गेली अनेक वर्षे न्हावा - शेवा सिलिंकचे काम समुद्रामध्ये सुरू आहे. त्यामध्ये गव्हाण, हनुमान कोळीवाडा, बेलपाडा, उरण आदी गावातील लोक प्रकल्पबाधीत होत आहेत. या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पारंपारिक मच्छिमार कृती समितीचे सदस्य व गव्हाण गावच्या मच्छिमार सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत कोळी व त्यांचे सहकारी रमेश कोळी, रामदास कोळी, दिलीप कोळी,  भरत कोळी, रमाकांत कोळी, कृष्णा कोळी यांच्यासह  इतर सहकारी यांनी आपली सर्व  कामे सोडून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांना यश आले. महाराष्ट्र शासनातर्फे प्रकल्पबाधित कोळी बांधवांना प्रत्येकी कुटुंब एक लाख 88 हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे.

प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये इतके नुकसान भरपाई शासनातर्फे कोळी बांधवांना मिळणार आहे.  

पारंपरिक मच्छीमार कृती समिती आजमितीला समाजाचा उत्कर्ष व्हावा यासाठी जे.एन.पी.टी. प्रशासन व इतर केंद्र सरकारच्या कंपनी बरोबर  सर्वोच्च  न्यायालयात खटला दाखल करुन कोळी समाजावर होणार्‍या अन्यायाची व्यथा न्यायालयात मांडून ते प्रकरण अंतिम चरणात आणले आहे. या समितीने कोळी बांधवाना न्याय मिळवून दिल्याने कोळी बांधवाने या समितीचे संबंधित पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत. गव्हाण कोळीवाडा 1062, हनुमान कोळीवाडा 250, बेलपाडा कोळीवाडा 100, उरण कोळीवाडा 99 असे विविध कुटुंब  प्रकल्पबाधितांना शिवडी ब्रिज प्रकल्प अंतर्गत नुकसान भरपाई मच्छीमारांच्या खात्यात जमा झाले आहेत. पहिला हप्ता मिळाला असून इतर रक्कम टप्प्या टप्प्याने प्रकल्प बाधितांना मिळणार आहे.

 

अवश्य वाचा