रायगड
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील माणकुळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुजीत गावंड यांच्या विरोधात पदाचा गैरवापर करीत असल्याबद्दल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39 अन्वये माजी सरपंच सत्यविजय पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. पदाचा गैरवापर करीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या सरपंच सुजीत गावंड यांना पदावरुन दुर करुन अपहार केलेल्या लाखो रुपंयाची भरपाई घेण्याची मागणीही सत्यविजय पाटील यांनी केली आहे.
सुजीत गावंड यांनी भ्रष्टाचाराचा कळस करताना एका कोर्या व्हावचरवर 9 हजार रुपये खर्च दाखवला आहे. ही रक्कम कोणास दिली, कशासाठी दिली याचा काहीच उल्लेख व्हावचर दिसत नाही. ग्रामपंचायत हद्दीत 123 विजेचे खांब असताना तीन वर्षात तब्बल 656 एलईडी बल्ब आणि 454 होल्डर खरेदी करण्याचा सपाटाच लावला. त्यात अस्तित्वातच नसलेल्या दुकानावरुन खरेदी करण्याचा पराक्रमही या भ्रष्ट सरपंचाने केला आहे. एकेक सीएफएल टयुब 8 हजार 100, बल्ब 5 हजार 670, 1600, 1700 रुपयांना देखील खरेदी केला आहे. काळा खजूर खरेदी केल्याचे एक बिल जोडण्यात आले आहे. 2 हजार रुपयांची खरेदी दाखविताना तो कोणासाठी आणला, कधी आणला, कोणी खाल्ला, किती किलो आणला याबाबतचा काहीच उल्लेख ही करण्यात आलेला नाही तसेच पावतीवर तारीख देखील नाही.
कोर्या निविदा बनावट दस्त
अनेक कामांच्या निविदा अर्ज काढताना देखील मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला आहे. कोर्या निविदां अर्जांवर पेण तालुक्याचा उल्लेख आहे. तसेच स्विकारलेल्या निविदा देखील त्याच असल्याचे दिसून येते. यात प्रशासकीय मान्यतेपेक्षा अधिक रकमेचा कार्यारंभ आदेश दिला गेल्याचा उल्लेख दिसून येतो. एक लाखाचे प्रशासकीय मान्यतेचे काम प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश देताना 1 लाख 24 हजार रुपये दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे 24 हजार रुपयांचा अपव्यय करण्यात आल्याचे स्पष्ट होते. पुरुषोत्तम पाटील यांच्या नावाने खोटी निवीदा अर्जावरस सही दाखवून बिल काढण्यात आलेले आहे. याविरोधात स्वतः पुरुषोतम पाटील यांनी प्रतिज्ञापत्रातून ही सही आपली नसून आपली संमती न घेताच सदर नाव घेतल्याचा आक्षेप घेतला आहे.
सत्यविजय पाटील यांनी अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे केलेल्या आपल्या अर्जामध्ये ग्रामपंचायत मधील कामात खोटे दस्त बनवून सरपंच यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, हे नमूद करून महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 कलम 39 अन्वये सरपंच यांना आपण सरपंच पदावरून दूर करून अपहृत केलेली रक्कम शासन जमा करून फौजदारी स्वरूपाची कारवाई सरपंच सुजीत गावंड यांच्यावर करण्याची मागणी केली आहे.सरपंच श्री सुजित जनार्दन गावंड हे एका खाजगी वित्तीय संस्थेच्या नवीन पनवेल शाखेत नोकरीस असून ते नवीन पनवेल येथेच राहतात. त्यामुळे ते फक्त पंचायतीच्या सभांना उपस्थीत राहतात. त्यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातील भेडसावणार्या समस्यांना वाली कोण हा प्रश्न देखील ग्रामस्थांना भेडसावत आहे.