श्रीवर्धन 

  श्रीवर्धन तालुक्याला पुन्हा एकदा जोरदार वादळाचा तडाखा बसला आहे.सोमवारी रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास जोरदार हवा सुटली त्यामुळे नागरिक प्रचंड प्रमाणात भयभीत झाले होते. तसेच आज सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांमध्ये जोरदार वेगाने वारे वाहत होते.

 अनेक नागरिकांनी आपल्या घरावरती आत्ताच नवीन छप्पर केले होते. परंतु त्यामध्ये देखील काही पत्रे उडाल्याच्या घटना श्रीवर्धन तालुक्यात घडल्या आहेत. फक्त हे वादळ चक्रीवादळ नसल्यामुळे नुकसान कमी झाले. परंतु वादळाचा वेग चक्रीवादळा सारखाच होता. वास्तविक पाहता हवामान विभागाकडून अशा प्रकारच्या वादळाची सूचना नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. श्रीवर्धन तालुक्यात पावसाचे प्रमाण फारसे नाहीये. परंतु वाराच खूप मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. पाऊस रिमझिम रिमझिमच आहे. समुद्र मोठ्याप्रमाणावर खवळलेला असून समुद्रात उंच उंच लाटा उसळत आहेत. निसर्ग चक्रीवादळ अनुभवलेला नागरिकांना जरादेखील वारा सुटला की काळजाला चर्रर्र होऊन जात.

 दुपारी बारा वाजल्यानंतर वादळाचा वेग जरा कमी झाला तरी पावसाची एखादी सर येण्याअगोदर जोरदार वारे सुटत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. याअगोदर वारा किती वाढला असला तरी समुद्रावर असलेली केतकीची बने व सुरूची झाडे यामुळे तो बर्याच प्रमाणावर आडला जायचा. परंतु निसर्ग चक्रीवादळा मध्ये संपूर्ण केतकीची बने व सुरु उध्वस्त होऊन गेला आहे. नागरिकांच्या नारळ सुपारीच्या बागांमध्ये असलेले मोठे वृक्ष त्याचप्रमाणे नारळाची मोठी झाडे ही सुद्धा जमीनदोस्त झाल्यामुळे वार्‍याचा वेग जास्त प्रमाणात जाणवत आहे.