अलिबाग 

लॉकडाऊन नंतर सुमारे दोन महिन्यांनी सर्वसामान्यांची लाडकी लाल परी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा म्हणजेच एसटी शुक्रवारी पुन्हा रायगडच्या रस्त्यावर धावताना पहायला मिळाली खरी मात्र प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने नियोजित फेर्‍यांपेक्षा फक्त 70 फेर्‍याच सोडण्यात आल्या. प्रत्यक्षात प्रवास गर्दीनुसार मुख्य मार्गावर वाहतूक करण्यात येणार्‍या 36 एसटी गाड्यांद्वारे 324 फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले होते.

कोरोनाला रोखण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यापासून आरोग्य, पोलीस आदी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद करण्यात आली होती. रायगडची एसटी 12 कोटीहून अधिक तोटयात गेली. 60 दिवसाच्याप्रतिक्षेनंतर अटी शर्तीवर एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. जिल्हयातील अलिबाग आगारातून 36, महाड आगारातून 44, पेण आगारातून 46, कर्जत आगारातून 14, रोहा आगारातून 68, मुरुड आगारातून 24, माणगाव आगारातून 28 फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले होते. 22 मे पासून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली.  

सामाजिक अंतर राखून प्रवाशांनी एसटीमध्ये बसणे. ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वर्षाखालील मुलांना एसटी प्रवासाला बंदी करणे. बसमध्ये बसण्यापुर्वी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे, तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे अशा अटी शर्तीवर एसटी बस सेवा सुरु करण्यात आली. प्रवाशांच्या संख्येचा आढावा घेऊन मुख्य मार्गावरूनच एसटी बस सोडण्यात आली. त्यात अलिबाग आगारातून सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग पेण, मुरुड आगारातून मुरुड अलिबाग, पेण आगारातून दुपारी पेण - पाली, अशा बसेस सोडण्यात आल्या. दोन महिन्यांनंतर एसटी सेवा सुरु झाल्याने  प्रवाशांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळून आला असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी नियोजित फेर्‍यांपेक्षा फक्त सुमारे 22 टक्के फेर्‍या पाठवण्यात आल्या. पहिल्याच दिवशी फक्त 70 फेर्‍या सोडण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!