अलिबाग 

कोरोना विषाणू संसर्गामुळे नगराध्यक्ष प्रशांत नाईक मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा दरवर्षी आयोजित करण्यात येणार दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र हा उत्सव रद्द करताना त्याच्या बक्षिसाच्या रकमेतून जिल्हा रुग्णालयाला ऑक्सीजन काँन्सेनट्रेटर मशिन भेट देऊन आगळीवेगळी अशी सामाजिक जबाबदारीची दहीहंडीच उभारून रुग्णांना दिलासा दिला आहे. या मशिनमुळे अत्यवस्थ रुग्णांना ऑस्किजनची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्याकडे हे मशिन प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सुपुर्द केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद गवई, वैद्यकिय अधिक्षक डॉ. विक्रमजित पाडोळे, नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती अनिल चोपडा, नगरसेवक अजय झुंजारराव, महेश शिंदे, प्रशांत नाईक मित्रमंडळ उपाध्यक्ष अश्‍विन लालन, सदस्य अमित नारे, रवी थोरात आदी उपस्थित होते.

अलिबागमध्ये गोकुळाष्टमीला दरवर्षी प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या दहीहंडीचे संपूर्ण जिल्हाभरात आकर्षण असते. या दहीहंडीसाठी लाख रुपयांचे पारितोषीकही लावण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयोजक अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम रद्द करीत असतानाच सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याचे काम प्रशांत नाईक मित्रमंडळाने केले आहे. दहीहंडीच्या बक्षिसाच्या 1 लाख 10 हजार रुपये रकमेचे दोन ऑक्सिजन काँन्सेनट्रेटर या मंडळाने जिल्हा रुग्णालयाला दिले आहे. कोरोनाच्या काळात या यंत्रांचा मोठा उपयोग रुग्णांना होईल, असे मंडळाचे अध्यक्ष नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी म्हटले आहे.

अलिबागचे शहरामध्ये सर्वात मोठ्या रकमेची दहीहंडी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मित्रमंडळाकडून बांधली जाते. अलिबागच्या आसपासची बहुतांश गोविंदा पथके या स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे ही हंडी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र असते. मात्र यंदा कृष्णजन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. स्वतः नगराध्यक्ष प्रशांत नाईक कोरोना पॉझिटीव्ह आले होते. ते आजारातून हळूहळू बाहेर येत आहेत. त्यांंची प्रकृती बरी असली तरी त्यांना सक्तीचा आराम आहे.

अशा परिस्थितीत प्रशांत नाईक यांनी दहीहंडी स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेत कोरोना रुग्णांसाठी प्रत्येकी 55 हजार रुपये किंमतीचे दोन ऑक्सिजन संकेंद्रक यंत्र जिल्हा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आज दोन यंत्र जिल्हा रुग्णालयाला दिली. कोरोनाची महामारी गंभीर आहे, या काळात रुग्णांना ऑक्सिजन यंत्राचा निश्‍चित होईल, असा विश्‍वास मित्रमंडळच्या वतीने नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती  अनिल चोपडा यांनी व्यक्त केला.  

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही