नेरळ  

कर्जत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमधील मोठ्या नाल्यांची सफाई ग्रामपंचायत कडून करण्यात आली आहे. ग्रामपंचायतकडून पूर्व मौसमी कामे करताना नाल्यांमध्ये वाढलेली झाडे झुडपे आणि मातीचा गाळ काढून टाकण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतने नालेसफाई केल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.

नेरळ गावातून दोन मोठे नाले असून त्यातील एक नाला हा माथेरानच्या डोंगरातून वाहत येणारे पाणी वाहून नेणारे असून रेल्वे स्टेशन भागात ते दोन नाले हे एकत्र होतात. तर पूर्व भागात एक नाला असून हा नाला नागरी वस्तीमधून वाहत जातो आणि पुढे उल्हासनदीला जाऊन मिळतो. त्या दोन मोठ्या नाल्यांसह आणि पाडा तसेच टेपआळी भागातून वाहणारे नाले यांची साफसफाई ग्रामपंचायत प्रशासनाला पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावी लागते. काही भागातील नालेसफाई हे ते नाले अरुंद असल्याने मजूर लावून साफ करावे लागतात. तर मोठ्या नाल्यात थेट जेसीबी मशीन घालून त्यातून माती आणि वाढलेली झाडे झुडपे बाहेर काढून नाला रुंद करण्यात येतो. त्याचवेळी पावसाळ्यतील पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी साफसफाई मोहीम दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील मे महिन्यात हाती घेण्यात आली होती.

जुन महिना सुरू होण्याआधी नेरळ गावातील सर्व नाल्यांची साफसफाई उरकण्यात आली आहे. नालेसफाई सुरु असताना नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा तसेच उपसरपंच शंकर घोडविंदे तसेच ग्रामविकास अधिकारी आणि सर्व सदस्य हे त्यांच्या परिसरात नाले सफाई होत असताना उपस्थित राहून नाल्याची साफसफाई व्यवस्थित होते की नाही? याची माहिती घेत होते. मात्र नेरळ गावातून वाहणार्‍या नाल्यांची आणि ओहोळांची नालेसफाई ग्रामपंचायतने पूर्ण केल्याने यावर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्याची शक्यता आहे.पण सतत संततधार पाऊस होत असल्यास पाणी साठून राहण्याची शक्यता आहे. नेरळच्या पूर्व भागात मागील दोन वर्षे पावसाळ्यात पाणी साठून राहिले होते. त्यामुळे यावर्षी काय होणार याची काळजी प्रामुख्याने मातोश्री नगर, गंगा नगर, निर्माण नगरी भागातील लोकांना लागून राहिली आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....