महाड  

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा पुढील आठ दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानंतर जिल्ह्याकडे येणारे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेला रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा महाड तुळशीखिंड नातुनगर खेड रस्ता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने पुढील काही काळासाठी बंद केला आहे. केवळ वैद्यकीय सेवेला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर वैद्यकीय त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेला यातून वगळण्यात आले आहे. मागील महिन्यामध्येदेखील महाडवरुन जाणारा तुळशीखिंड नातुनगर खेड मार्ग अचानक बंद करण्यात आला होता. प्रशासनाने या मार्गावरुन कोणतेही वाहन येऊ नये यासाठी रस्त्याचे खोदकाम करुन मार्गावर दरडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळीदेखील त्याच पद्धतीने रस्ता बंद करण्यात आला असून, याबाबत रायगड जिल्हा प्रशासनाला कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नसल्याची माहिती उघड झाली असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन या दोन शासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.

वास्तविक कोणताही मार्ग बंद करण्यापूर्वी नागरिकांना सूचना देणे आवश्यक असून, मार्गावर फलक लावणे बंधनकारक असताना कोणतीही पूर्व सूचना न देता मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय तर झाली, परंतु मनस्तापदेखील सहन करावा लागत आहे. 1 ते 7 जुलै या कालावधीकरिता तुळशीखिंड मार्ग बंद करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतला असून, याबाबत कोकण विभाग आयुक्तांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....