Monday, March 08, 2021 | 08:25 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राज्यपालांचा धिक्कार
रायगड
25-Jan-2021 07:34 PM

रायगड

। मुंबई । प्रतिनिधी ।

नव्या कृषी कायद्यांना विरोध करीत संयुक्त किसान सभेचा हजारो शेतकरी आणि कष्टकर्‍यांचा मोर्चा सोमवारी मुंबईत दाखल झाला होता. राज्यभवनावर कूच करण्यासाठी निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले. राज्यपालांनी भेटीची वेळ देऊनही वाटाण्याच्या अक्षता दाखवत गोव्याला निघून गेल्याने शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. ज्या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे,परंतु,अन्नदात्याच्या प्रश्‍नाबाबत गांभीर्य नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध केला. यावेळी कोश्यारी तेरी होशियारी नही चलेगी या गगनभेदी घोषणा देत उपस्थित शेतकर्‍यांनी राज्यपालांचा धिक्कार केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभर वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्रातही शेतकर्‍यांचे लाल वादळ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी राजभवनावर धडकरणार होते. परंतु, आपल्या मागण्या घेऊन राजभवनाकडे निघालेल्या शेतकर्‍यांना मुंबईत मेट्रो सिनेमा चौकात अडविण्यात आलं. त्यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. त्यातच वेळ देऊनही ऐनवेळी राज्यपालांनी पळपूटीगिरी केल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ आहे,परंतु,अन्नदात्या शेतकर्‍यासाठी नाही. संतप्त शेतकरी नेत्यांनी राज्यपालांच्या कृतीचा निषेध करीत निवेदन फाडून टाकत,कोश्यारी तेरी होशियारी नही चलेगी,नही चलेगी अशा राज्यपालांच्या विरोधात घोषणा दिल्या.  

सरकार नाही भानावर,बळीराजा उतरला रस्त्यावर,शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या अंबानी-अदानी उद्योगपतींचा निषेध असो,कृषी कायदे मागे घ्या,शेतकरी संघटनांच्या एकजुटीचा विजय असो, लाल बावटे की, लाल झेंडे की जय, उद्योगधार्जिण्या मोदी सरकारचा निषेध असो, मोदी-शहांचा निषेध असो, कोश्यारी तेरी होशियारी नही चलेगी,अशा घोषणांनी आझाद मैदानातून निघालेल्या शेतकरी मोर्चाने मुंबईचा परिसर दणाणून गेला होता. नमित्त होते किसान समन्वय समितीच्या वतीने राजभवनावर विरोधात काढण्यात आलेल्या धडक मोर्चाचे.या मोर्चात राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चाच्या निमित्ताने शेतकर्‍यांना लुटणार्‍या अदानी, अंबानी उद्योगसमूहाला अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार मोर्चात सहभागी झालेल्या नेतेमंडळींच्यावतीने करण्यात आला. अंबानी जिओ आणि देशातील जनता मरो या केंद्राच्या धोरणावर कडाडून टीकाही यावेळी करण्यात आली.

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर मागील दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांचेे आंदोलन सुरु आहे. या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले होते. राज्यातील कानाकोपर्‍यातून शेतकरी मुंबई दाखल झाले. भाजपवगळता इतर सर्व पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चात सक्रीय सहभाग घेतला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, अजित नवले, कॉ. अशोक ढवळे, पशुसंवर्धन विकासमंत्री केदार सुनील, काँग्रेसचे नेते भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान,सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी नेत्यांनी केंद्र सरकारवर भाषणात जोरदार टीका केली.

राष्ट्रपतींना देणार निवेदन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेटीसाठी उपलब्ध नसल्याने आता शेतकर्‍यांचे निवेदन थेट राष्ट्रपतींना देणार असल्याचे यावेळी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी, राज्यपालांना देण्यासाठी आणलेल निवेदन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, अजित नवले, अशोक ढवळे, भाई जगताप, विद्या चव्हाण, सचिन सावंत इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत फाडून टाकण्यात आले. 

अदानी, अबांनींच्या उत्पादनांवर बहिष्कार

देशातील केवळ दोन उद्योगपतींच्या दबावामुळे नवे कृषी कायदे लागू केले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही उद्योगसमूहांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा आणि आवाहन यावेळी करण्यात आले. अदानी आणि अबांनींना धडा शिकविण्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांच्या उत्पादनांवर बंदी घालावी, तसेच जिओचे सिमकाडे सर्वांनी इतर कंपन्यांमध्ये पोर्ट करुन घ्यावे, तसेच अदानी-अबांनींच्या पेट्रोलपंपांवर अजिबात इंधन भरु नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

राज्यपालांची पळपूटगिरी

राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो किलोमीटरची पायपीट करुन आलेले शेतकरी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे निवेदन राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे देण्याची विनंती करणार होते. पण, ऐनवेळी राज्यपालांनी पळपूटगिरी करीत गोव्याला पळ काढला. राज्यपालांच्या या चलाखीचा हजारो शेतकर्‍यांकडून धिक्कार करण्यात आला.

आजचा मुक्काम आझाद मैदानावर

राज्यपालांच्या कृतीच्या निषेधार्थ त्यांना देणार असलेलं निवेदन याच स्टेजवरुन फाडून टाकण्यात आले. त्यानंतर मोर्चेकरी शेतकर्‍यांच्या एकजुटीला आणि ताकतीला सलाम करीत त्यांना शांततेत आझाद मैदानात मुक्काम करण्याची विनंती करण्यात आली. तसेच प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारीला तिरंग्याला वंदन करुन, प्रतिज्ञा करण्यात येणार आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top