नेरळ

 परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.कर्जत तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान यांची पाहणी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली.त्यावेळी आमदार थोरवे यांनी तसे आदेश दिले आहेत.

  तालुक्यातील भाताच्या शेतीचे सरत्या पावसासोबत आल्याने वार्‍यामुळे मोठे नुकसान झाले आहे.जागोजागी भाताची शेती जमीनदोस्त झाली असून भाताचे पीक शेतात खराब होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्या शेतीचे पंचनामे व्हावेत यासाठी शासनाकडे मागणी करीत आहे.त्याचवेळी भाताच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.मात्र पंचनामे वस्तुनिष्ठ होत आहेत किंवा नाही तसेच शेतीचे नुकसान किती झाले आहे याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज रविवारी सुट्टीच्या दिवशी पाहणी दौरा केला.या पाहणी दौर्‍यात कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

 प्रभारी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी कृषी विभाग,महसूल विभाग आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून साधारण 80 जणांची टीम शुक्रवार पासून पंचनामे करीत असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.तर 21 ऑक्टोबर पर्यंत तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे यांचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती तहसीलदार यांचे वतीने नायब तहसीलदार अमोल चव्हाण यांनी दिली. पंचनामे करण्याच्या कामात 54 ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी,22 तलाठी आणि 24 कृषी सहायक हे काम करीत असल्याची माहिती आमदार थोरवे यांना प्रशासनाचे वतीने देण्यात आली.

   या दौर्‍यात आमदारांना झालेल्या नुकसानीची माहिती शेतकरी सुनील रसाळ,शांताराम शेळके, जयवंत शेळके,संदीप मसणे, उपसरपंच सुभाष काळण,आदी शेतकरी यांनी दिली.