रायगड
। म्हसळा । वार्ताहर ।
जानेवारीपासून नववर्षाच्या सुरुवातीलाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे म्हसळा तालुक्यात अवकाळी पावसाने वीटभट्टीवाल्यांचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील काजू-आंबा बागायतदार हवालदिल झाला असून पुन्हा एकदा शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.
या पावसामुळे गुरांसाठी वर्षभर पुरावा एवढा खाद्य साठा पूर्णपणे भिजून खराब झाल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येते. म्हसळा तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात वीटभट्टी उद्योग आणि आंबा-काजू बागायतदार असल्याने नुकत्याच वीटभट्टी उत्पादन केले होते तर बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात फवारणीही केल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले. परंतु पावसामुळे संपूर्ण औषधे धुऊन गेल्याने पुन्हा फवारणी करण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. काही ठिकाणी तर अद्याप भातझोडणी झालेली नसल्याचे त्यांच्या उडव्याही भिजून ओल्या चिंब झाल्याचे दृश्य दिसत आहे. तालुक्यात गोंडघर, मेंदडी, खरसई, पाभरे, खारगाव, चिखलप, रेवली, बनोटी आणि खाडी किनारपट्टी भागात खूप मोठ्या प्रमाणात वीट भट्टी उद्योजक असून ते फार मोठ्या संकटात असून शासनाच्या मदतीकडे डोळे लावून आहेत.