रायगड
अलिबाग
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीसह स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्सचे नितेश सरडा यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवार, (ता.4) रोजी रायगड पोलिसांनी दोषारोप दाखल केले आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा पुर्ण झाला असून आमच्याकडे सबळ पुरावे जमा झालेले असल्याचा दावा रायगड पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात कालच दाखल केली होता. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयात केली होती. यावरील निर्णयाची प्रतिक्षा न पहाताच रायगड पोलिसांनी दोषारोप दाखल केल्याने या प्रकरणाने पुन्हा एकदा कलाटनी घेतली आहे. 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग- काविर येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पुर्ण करीत हे दोषारोप दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली आहे.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. हा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती असून इतर सबळ पुरावे दरम्यानच्या कालावधीत शोधण्यात यश आल्याचा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. 4 नोव्हेंबरला रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीसह अन्य दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी दिली होती. या आदेशाचा पुर्नविचार करुन पोलिस कोठडी मिळावी म्हणून रायगड पोलिसांनी जिल्हा न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात हे प्रकरण सुरु असतानाच अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तात्पुरता जामीन मिळवला होता. याच दरम्यान रायगड पोलिसांनी प्रकरणाचा तपास पुर्ण करीत आत्महत्येस कारणीभुत असल्याप्रकरणी अर्णब गोस्वामीसह अन्य दोघांवर जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल केले आहे.