माणगाव  

निसर्ग चक्रीवादळ होऊन दोन महिने झाले तरी माणगाव नगरपंचायत हद्दीतील तसेच तालुक्यातील खरे नुकसान झालेले वादळग्रस्त नागरिक अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. माणगावात शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे नुकसान झालेल्या भागाची पाहणी न करता एका घरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना बोलावून पंचनामे करून वारेमाप नुकसान दाखवले आहे. शिक्षकांद्वारे माणगावात करण्यात आलेले हे पंचनामे पूर्णपणे चुकीचे असून नुकसान भरपाईच्या नावाखाली तहसील कार्यालयाकडून आपल्या जवळच्या लोकांचे पंचनामे मंजूर करण्यात येऊन खरे नुकसान झालेल्या नागरिकांचे पंचनामे शेडच्या नावाखाली बाजूला ठेवण्यात आले असल्याचा आरोप येथील शेकापचे युवानेते तथा माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सभापती थोरे पाटील यांनी केला आहे.

निलेश थोरे म्हणाले की, तीन जून रोजी निसर्ग चक्रीवादळ झाल्यावर माणगाव तालुक्यात बहुतेक ठिकाणी पंचनाम्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. या शिक्षकांनी वादळग्रस्तांच्या नुकसानीची पाहणी न करता एका घरात बसून त्याठिकाणी वादळग्रस्तांना बोलावून पंचनामे वादळग्रस्त बोलतील त्याप्रमाणे केले  आहेत.काहींनी तर अवाच्या सव्वा नुकसानीचा खर्च दाखविला आहे.माणगावात अनेक शेडवल्यांना नुकसान भरपाई पहिल्याच झटक्यात देण्यात आली.मात्र काही शेडवाल्यांचे पंचनामे बाजूला ठेवण्यात आले.हा माणगाव तहसीलचा दूजाभाव नाही तर काय? असा सवाल निलेश थोरे पाटील यांनी उपस्थिती केला आहे.

   ते पुढे म्हणाले नुकसान झालेल्या भारतीय सर्व नागरिकांना नुकसान भरपाई शासनाने शेडसकट सर्वांना द्यायला हवी.खरे तर करण्यात आलेले पंचनामे हे सर्कल,तलाठी,मंडळ अधिकारी यांच्यामार्फत झाले असते तर  त्यांनी नुकसानीची पाहणी करून योग्य पंचनामा केला असता.तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले असते की, कुणाच्या घरावरील पत्रे गेले की, शेडचे पत्रे गेलेत. मात्र शिक्षकांनी  घरात बसून  वादळग्रस्त सांगतील त्याप्रमाणे नुकसान भागाची पाहणी न करता पंचनामे केले आहेत. हे सर्व माणगावमधील पंचनामे यांची चौकशी रायगड जिल्हाधिकारी यांनी करून सर्वांचे पुन्हा पंचनामे करावेत.माणगाव तहसील कार्यालयाने  साधे  नुकसानीचे फोटो वादळग्रस्तांकडून घेतलेले नाहीत.पंचनामा करताना वास्तविक नुकसानीचे फोटो,पुरावा म्हणून तहसीलने घ्यायला हवे होते.एकंदरीत माणगावात नुकसान भरपाईच्या नावाखाली शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला आहे.याची चौकशी व्हावी अन्यथा वादळग्रस्तांना बरोबर घेऊन येत्या आठ दिवसांमध्ये तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा आणू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही