वाकण 

  नागोठण्यात दरवर्षी येणारा पूर व त्यामुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती व त्यावेळी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भातील विविध विषयांवर नागोठण्यातील आपत्ती व्यवस्थापन बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय या बैठकीत सुचविलेल्या अनेक मुद्द्यांवर संबधित अधिकारी वर्गाने काय काम केले आहे हे पाहण्यासाठी पंधरा दिवसांनी आढावा बैठक बैठक घेण्यात येईल असे रोहाचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी स्पष्ट केले. तर आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बाबतीत नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघ इतरांसाठी आदर्शवत ठरेल असे नियोजन होण्याची गरज असल्याचे मत राजिप सदस्य किशोरभाई जैन यांनी यावेळी व्यक्त केले.  

 नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसचीवालयातील सभागृहात शनिवारी (दि.30) दुपारी   झालेल्या या बैठकीस प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांच्यासह राजिपचे सदस्य किशोर  जैन, रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सुरेश जैन, रोहा पंचायत समितीचे सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, नागोठणे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कोळी, वीज वितरण कंपनीचे कनिष्ट अभियंता वैभव गायकवाड,  ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, महामार्ग चौपदरीकरणाचे ठेकेदार जे.एम.म्हात्रे इन्फ्रा कंपनीचे महाव्यवस्थापक राजेश म्हात्रे, नागोठणे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्‍वर साळुंके, नागोठणे पोलीस ठाण्याचे निलेश महाडिक, नागोठणे तलाठी गणेश विटेकर, वरवठणे तलाठी गणेश विटेकर, पाटणसई तलाठी एस. बी. केंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

 या आपत्कालीन बैठकीत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्प, श्‍वान दंश, पावसाळ्यातील साथीचे आजार व इतर औषधांचा पुरवठा मुबलक असल्याचे डॉ. स्नेहल कोळी यांनी स्पष्ट केले. मात्र आरोग्य समितीची बैठक लावण्यात येत नसल्याने समितीचे अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी नाराजी व्यक्त केली. याचवेळी आरोग्य सेवेसह पूरग्रस्त विभागात नोडल अधिकारी नेमणे, वीज कंपनीकडून आवश्यक असलेल्या उपाययोजना, सर्प मित्र, पोहणार्‍या व्यक्ती यांच्यासह पूरग्रस्त परिस्थितीत उपयोगी ठरणार्‍या स्वयंसेवकांची यादी तयार करणे, महामार्गावर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ठेकेदार कंपनीने क्रेन, जेसीबी, डंपर व कर्मचारी तयार ठेवणे अशा अनेक महत्वपूर्ण सूचना प्रांताधिकारी यशवंत माने यांनी यावेळी केल्या.  

 

अवश्य वाचा