रायगड
। जेएनपीटी । वार्ताहर ।
मागील 32 वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचे नव्याने पुनर्वसन न केल्याने या कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.21) जेएनपीटीचा समुद्री मार्ग रोखण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत प्रशासनाने ग्रामस्थांसोबत चर्चा करुन 35 दिवसांची वेळ मागितल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थ, मच्छिमारांकडून हे आंदोलन करण्यात येणार होते. जेएनपीटी वसविण्यासाठी हनुमान कोळीवाडा हे गाव उठविण्यात आले होते. मात्र या गावाचे शासकीय मानकांनुसार पुनर्वसन करण्यात आले नाही. 17.5 हेक्टर जागेवर पुनर्वसन करणे गरजेचे असताना फक्त साडेचार हेक्टर जमिनीवर ते सुध्दा वाळवीच्या जागेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे संपुर्ण गावात घरांना वाळवीने पोखरले आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार 17 हेक्टर जागेवर आणि सोयी सुविधा असलेल्या जागेवर आमच्या गावाचे पुन्हा पुनर्वसन करावे, अशी मागणी सातत्याने हे ग्रामस्थ करत आहेत. यासाठी केंद्र सरकारपासून राज्य सरकारचे उंबरठे झिजवले मात्र त्यांना न्याय मिळाला नाही.
अखेर ग्रामस्थांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेत समुद्रात जेएनपीटीची कोंडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशासनाने चर्चा करुन ग्रामस्थांकडे 35 दिवसांची मुदत मागितल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.