रायगड
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नियम डावलून दस्त नोंदणी करत मुद्रांक बुडविल्याचा आरोप करीत पेण येथील दुय्यम निबंधक यांच्या विरोधात सह जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार करुन चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. त्यावर सह जिल्हा निबंधक यांनी ज्यांच्याविरोधात तक्रार आहे त्या दुय्यम निबंधक यांनाच या प्रकरणी कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष शालोम पेणकर यांनी 10 डिसेंबर रोजी पेणच्या दुय्यम निबंधकांविरोधात सह जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यानुसार पेण दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सद्यस्थितीत एकाच मिळकतीबाबत वेगवेगळी शासकीय किंमत आकारली जात असून दस्त नोंदणीसाठी कायद्याने आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न करताच आर्थिक उलाढाली करुन दलालांमार्फत दस्त नोंदणीसाठी सादर केल्याच्या तक्रारी येत असल्याचे म्हटले आहे. याचे दाखले देताना शोमेर पेणकर यांनी 2018 ते आतापर्यंत नोंदणीकृत अखत्यारपत्र नसताना देखल दस्तऐवज नोंदणी केल्याचे उघडकीस आणले आहे. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे आदिवासी खातेदारांची नोंदणी बंद असताना विशिष्ट एजंटमार्फत आलेले अशा प्रकारचे दस्त नोंदणीकृत केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची सखोल चौकशी करण्यासाठी दस्त नं 784/2020 ची तसेच याप्रमाणे झालेल्या इतर दस्तांची चौकशी करण्यासाठी सदर दस्त तपासण्याचीही मागणी करण्यात आली आहे. एमएमआरडीए प्रभाव क्षेत्रात गावांची नोंदणीचे दस्त नोंदणीसाठी झोन दाखला असणे गरजेचे असून त्यानुसार शासकीय मुद्रांक आकारला जातो असे असताना सन 2018 चे आजमितीपर्यंतच्या बर्याच दस्तांमध्ये जे प्रभाव क्षेत्रातील गावांबाबत दस्त झाले आहेत त्यातील बर्याच दस्तांसोबत झोन दाखला जोडून न घेता शासनाचे सदर कार्यालयीन अधिकारी घोडजकर यांनी शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोप केला आहे. व बुडीत महसूल गोळा करण्याची मागणी केली आहे. सावरसई येथे एकाच मिळकतीसाठी मुल्यांकन वेगवेगळे करुन शासनाचे मुद्रांक बुडवून स्वार्थ साधत असल्याचेही म्हटले आहे.
दुय्यम निबंधक पेण यांनी अनागोंदी कारभार करीत नियम डावलून दस्त नोंदणी केली आहे. यामुळे मुद्रांक शुल्क आकारणी शासनाची फसवणूक झाली आहे. याबाबत सह जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. मात्र सह निबंधक यांनी याबाबत दुय्यम निबंधक पेण यांनाच या प्रकरणी कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे हास्यास्पद असून, सह निबंधक यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
शालोम पेणकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड