नेरळ 

राज्य परिवहन मंडळाच्या कर्जत आगारातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पनवेल,अलिबाग आणि खोपोली या शहरात जाण्यासाठी प्रवासी वाहतूक राज्य परिवहन मंडळाने सुरू केली आहे.दरम्यान, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची नाळ एसटी सोबत जुळली असल्याने ग्रामीण भागात एसटी गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.लॉक डाऊन नंतर आता अनलॉक मध्ये राज्य परिवहन मंडळाकडून जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कर्जत एसटी आगार अंतर्गत कर्जत तालुक्यातील नेरळ आणि खालापूर तालुक्यातील खोपोली येथे एसटी स्थानके आहेत. त्या एसटी स्थानकामधून कर्जत आगार अंतर्गत वाहतूक सुरू असते.कर्जत आगारातून आता पुन्हा सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यात कर्जत आगारातून पनवेल,अलिबाग आणि खोपोली साठी गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात यापूर्वी सर्वाधिक व्यवसाय देणार्‍या कर्जत- पनवेल मार्गासाठी 10 गाड्यांची वाहतूक होणार आहे.तर पनवेल-कर्जतच्या मार्गावर दिवसभरात 11 गाड्यांची वाहतुक होणार आहे.दुसरीकडे अलिबाग या जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी एकमेव गाडी चालविली जाणार असून तीच गाडी नंतर अलिबाग वरून कर्जत अशी वाहतूक करणार आहे.तर कर्जत येथून खोपोली साठी 3 गाड्या सोडण्यात येत आहेत,तर खोपोली-कर्जत अशा दोन गाड्या चालविण्यात येत आहेत.तर कर्जत आगाराच्या खोपोली एसटी स्थानकातून पनवेल साठी 9 गाड्या सोडण्यात येत आहेत.तर पनवेल येथून आठ गाड्या खोपोली साठी सोडल्या जात आहेत.    

खोपोली स्थानकातून पाली आणि पेण साठी एकही गाडी सोडली जात नाही, त्याचवेळी कर्जत येथून देखील पाली आणि पेणसाठी कोणतीही गाडी नाही.खोपोली एसटी स्थानकातून खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गाड्या सोडल्या जातात,मात्र त्या गाड्या देखील अद्याप सुरू झाल्या नाहीत.खोपोली स्थानकातून ग्रामीण भागात सोडल्या जाणार्‍या एसटी गाड्यांना चांगली गर्दी असते.त्याच प्रकारे कर्जत आगारासाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारे नेरळ एसटी स्थानकातून ग्रामीण भागासाठी एसटी गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे नेरळ स्थानकातून ज्या 10 ठिकाणी गाड्या सोडल्या जातात,त्या ग्रामीण भागात एसटी गाड्या सूर करण्याची मागणी जोर धरत आहे.नेरळ एसटी आवाराच्या बाजूला राहणारे अरविंद कटारिया यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागासाठी एसटी गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी कर्जत येथून बदलापूर पर्यंत देखील गाडी सुरू करावी,पण त्यात जिल्ह्याचा अडथळा येत असेल तर मात्र शेलु पर्यंत गाडी सोडावी अशी मागणी कटारिया यांनी कर्जत एसटी आगराकडे केली आहे.

अवश्य वाचा