Friday, March 05, 2021 | 07:26 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

...नाहीतर पाणी टंचाई अटळ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रायगड
22-Feb-2021 07:48 PM

रायगड

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सध्या राज्य देश संपूर्ण जग करोना सारख्या भीषण संकटाशी मुकाबला करीत आहे. त्याचबरोबर पाणी ही देखील मोठी समस्या आहे. पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरा, नाहीतर पाणी टंचाई अटळ असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला दिला.  पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील न्हावा-शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (दि.22) संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री आदिती सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे, आ. बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, पंचायत समिती पनवेल सभापती देवकी कातकरी, खानावळेच्या सरपंच जयश्री नाईक,  बारवाई सरपंच नियती बाबरे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, माणूस तहान लागली की विहीर खणतो. पाण्याची पातळीही खूप खोल जात आहे. या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा र्‍हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, दुसरीकडे समुद्र किनारे आहेत पण पर्यावरणाला धोका पोहोचवून केलेला विकास आपल्याला नकोय. प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी  त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन उभारावेत,  मात्र त्यासाठी वनसंपदा नष्ट करता कामा नये. भारताच्या स्वातंत्र्याला 75वर्षे पूर्ण होतील पण पिण्याचे पाणी गावागावात घेऊन जाऊ शकलो नसलो तर काही अर्थ नाही. मुंबईलगतच्या या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर  भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत नव्हे तर वेळेआधी पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. केवळ रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे, असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.

आरोग्याचे काटेकोर पालन

कालच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेमाने आणि हक्काने सूचना दिल्या होत्या. एकीकडे मी सांगतोय की, सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि आज आपण हा रायगड येथील कार्यक्रम करतोय, पण हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि मुख्य म्हणजे पाण्याशी संबंधित आहे. आरोग्याचे काटेकोर नियम पळून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. 

जगामध्ये यापुढील भांडणे पाण्यासाठीच होतील.  गावागावत पाण्याकरिता वाद होऊ नयेत, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजना करणे, लोकांनी जलसाक्षर बनणे, ही काळाची गरज बनली आहे. करोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वांनीच काटेकोरपणे आपली, कुटुंबाची, समाजाची काळजी घ्या.

-अजित पवार, उपमुख्यमंत्री 

राज्य सरकारच्या अथक  प्रयत्नामुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता ती पुन्हा वाढत आहे. त्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्राकडून 40 हजार कोटी येणे बाकी असले तरीसुद्धा जनतेच्या हिताचे आणि राज्याच्या विकासासाठी असलेले प्रकल्प चालूच आहेत. आर्थिक अडचण भासत असली तरी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणारही नाही. हा प्रकल्प दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. प्रकल्प निर्मितीसाठी येणार्‍या अडचणींवर मात करून प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काळजी घ्यावी.  

- एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मोठमोठी धरणे महाराष्ट्रात उभी केली आहेत. मोरबे धरण हे सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभे केले आहे. न्हावा-शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होत असल्याने आनंद होत आहे. 

- गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top