रसायनी,

    दांड रसायनी रस्त्यालगत वावेघर हद्दीत बीपीसीएल कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केल्याने वावेघर ग्रामपंचायतीने सुरु असलेल्या कामास प्रतिबंध करुन काम थांबविले आहे.

    बीपीसीएल कंपनीकडून वावेघर ग्रामपंचायतीला कोणतेही कागदपत्र अथवा परवानगी न घेता काम सुरु केल्याने वावेघर ग्रामपंचायतीकडून  कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठीचे सुचना पत्र देण्यात आले होते. परंतु दुसर्‍या दिवशीही  ठेकेदाराकडून काम बंद न झाल्याने वावेघर ग्रामपंचायतीकडून परिसरातील नागरिकांच्या साहाय्याने खोदकाम बंद करण्यासाठी मोठ्या संख्येने जमाव जमवून निदर्शने करण्यात आली. जमलेला जमाव पाहून कोरोना आजाराची कोणालाही भिती नसल्याचे चित्र पहावयास मिळाले.

        ग्रामपंचायतीचे थकीत कर बीपीसीएल कंपनीकडून येणे बाकी असल्याने आमचा हा लढा असल्याचे वावेघर ग्रामपंचायतीने स्पष्ट केले. शिवाय हा लढा कोणत्याही शेतकरी अथवा शेतकरी संघटनेविरुद्ध नसून बीपीसीएलआणि एचओसी कंपनीने बुडविलेला कर मिळविण्याच्या दृष्टीने सुरु असल्याचे वावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय चव्हाण , उपसरपंच विलास माली यांच्यासह ग्रामपंचायत कमिटीने बोलताना सांगितले. यावर  अधिकार्‍यां शी संपर्क साधला असता आम्ही परीसरातील ग्रामपंचायतीना ज्याप्रमाणे कागदपत्रे जमा करायला सांगितले त्याप्रमाणे वावेघर ग्रामपंचायतीने याअगोदर जमा केली नाहीत त्यासाठी आम्ही मागणी केली आहे असे  अधिकारी येलपाले यांनी बोलताना सांगितले.