रायगड
। अलिबाग विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातील अलिबाग आगाराच्या वतीने 23 जानेवारीपासून अष्टविनायक दर्शन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. सदर बस सेवेला चांगला प्रतिसाद लाभला तर दर शनिवार-रविवारी बस सोडण्यात येणार असल्याची माहीती आगार व्यवस्थापक वनारसे यांनी दिली.
सदर बस शनिवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता सोडण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी अलिबाग-वडखळ-पाली-महड-लोणावळा-नारायणगाव-लेण्याद्री-ओझर असा प्रवास करुन ओझर देवस्थानमध्ये मुक्काम करण्यात येणार आहे. तर दुसर्या दिवशी रविवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता प्रवास सुरु होईल. ओझरहून-रांजणगाव-सिद्धटेक-मोरगाव-थेऊर-स्वारगेटहून अलिबाग येथे रात्री 9.45 वाजता पोहचेल. सदर अष्टविनायक दर्शनासाठी प्रौढांना 910 रुपये तर मुलांसाठी 455 प्रत्येकी प्रवासी भाडे आकारण्यात येणार आहे. या प्रवासात 23 जानेवारी रोजी पाली येथे चहा नाष्टा, कार्लेफाटा येथे दुपारचे जेवण तर ओझर येथे रात्रीचे जेवण व मुक्काम तसेच 24 जानेवारी रोजी रांजणगाव येथे चहा नाष्टा, मोरगाव येथे दुपारचे जेवण असे नियोजन असणार आहे. त्यासाठी प्रवाशांनी स्वखर्चाने नाष्टा, जेवण व राहण्याची व्यवस्था करायची आहे. सदर यात्रेकरिता 40 प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाला तर सदर प्रवाशांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी बस सोडण्यात येईल. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक 8624014359, स्थानक प्रमुख 8149657542, वाहतूक नियंत्रक 9208411220, देवराज राऊत 7385665039, अभय साळवी 7756074413 आणि श्री. बर्वे 9822141603 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आगार व्यवस्थापक वनारसे यांनी केले आहे.