नवी मुंबई  

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली होऊन नवे आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईत  कोरोनाने आपला  डंख बाहेर काढलेला असताना राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बांगर यांच्या नियुक्तीवरून दिसून आले आहे.  मुख्य म्हणजे चार्ज घेतल्यावर नवनियुक्त आयुक्त बांगर तातडीने वेळ न दवडता अधिकार्‍यांची बैठक घेत ऍक्शनला सुरुवात केली आहे. त्यामुळे  कोरोनाच्या भस्मासुराचे आव्हान ठाकले आहे.

नवी मुंबईत सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची वाटचाल 10 हजारांच्या  जवळ पोहोचली आहे. अभिजित बांगर यांनी नागपूर महापालिकेत असताना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उक्तृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे  मुबई, ठाणे व पुण्यानंतर नवी मुंबईकडे केंद्र शासनाचे व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.  त्यामुळे शहर स्वच्छतेसोबत कोरोनाचा काटेरी मुकटू बांगर यांना पेलावा लागणार आहे. सध्या नवी मुंबईत बधितांच्या संपर्कात आलेल्यांचस कॉन्टॅक्ट  ट्रेस करणे, टेस्ट  वाढवणे तसेच लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करणे , स्वतःची टेस्टिंग लॅब, प्लाझ्मा थेरपी, या  गोष्टी पूर्ण क्षमतेने होणे महत्वाचे आहे. वाढीव संख्या लपवणे पालिकेला यापुढे महागात पडणार आहे. त्यासोबत अति सौम्य, सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणांची वर्गवारी नागरिकांसाठी जाहीर केल्यास तीव्र लक्षणे असलेले एकूण आकडेवारीत किती रुग्ण आहेत व तेच उपचार घेत आहेत हे समजल्यास भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात आयसीयू बेडची संख्या वाढवणे, खासगी रुग्णलयांची मक्तेदारी मोडीत काढत वाढीव बिलाना चाप लावणे, सिडको कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करणे, व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याचे मोठे आव्हान आहे.  सध्या सुरू असलेला रुग्णवाहिका चालकांच्या थकीत बिलाचा प्रश्‍न सोडवणे देखील महत्वाचे आहे.  त्यासोबत रॅमिडीसीवर व टोसीलिजमजन्मएब इंजेक्शन उपलब्ध करून काळाबाजार रोखणे,  परिणामकारक जनजागृती करून नागरिकांमधील भीती घालवण्याचे आव्हान आयुक्त बांगर यांच्यासमोर असणार आहे. सध्या कोरोनाचे नियंत्रण हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे प्रशासनात कोणताही अधिकारी आल्यास त्यांच्या निर्णयाला व कार्यपूर्तता करताना नागरिकांची साथ लाभणे गरजेचे आहे. नवी मुंबईकर तीन महिन्यांपासून घरी असल्याने व कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटल्याने लादलेल्या लॉकडाऊनमुळे  संताप व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन  वाढवून नागरिकांच्या उद्रेकाला वाट मोकळी करून द्यायची की आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करायची ?  यासाठी युद्धपातळीवर निर्णय अभिजित बांगर यांना घ्यावा लागणार आहे.