अलिबाग 

वारंवार वीज खंडित होत असल्याच्या निषेधार्थ शेकापक्षाचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील 14 सरपंचांनी महावितरण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथील अधिकार्‍याला घेराव घालून जाब विचारला. हे आंदोलन केले आहे. 15 दिवसांत कारभार बदलला नाही तर, आरसीएफ कंपनीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिला आहे.

रेवस फिडर अंतर्गत अनेक गावे अलिबाग ग्रामीण महावितरणच्या अखत्यारित येतात. आठ महिन्यांपासून रेवस फिडमधील गावात वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात 15 जून 2019 रोजी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले होते. यापूर्वी रेवस फिडरवरील सर्वच गावांना वारंवार विज खंडीत होण्याचे प्रमाण मोठे होते. आता रेवस वगळता बहिरोळे, बेलवली, मापगाव, अशा गावांमध्ये अजूनही सातत्याने बिघाड होत असतातच. आवास, मांडवा, रांजणपाडा या नव्या फिडरवरुन होत असलेल्या विजपुरवठा वारंवार खंडीत होत असतो. त्यामुळे चोंढीपुलापासून रेवस धक्का ते सारळ या परिसरातील धोकवडे, सासवणे, आवास, रहाटले, कोळगाव, दिघोडी या अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरुच असतो. 3 जूनच्या चक्रीवादळानंतर उध्वस्त झालेले विजेचे खांब, विजवाहिन्या आणि अन्य साहित्य आता नव्याने बसविण्यात आल्यांनतरही विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण ना थांबल्या ना कमी झाल्या याबद्दल दिलीप भोईर यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

वीजग्राहकांना होत असलेल्या या त्रासाबाबत महावितरण अधिकार्‍यांना अनेकदा निवेदन देण्यात आली होती. मात्र, अद्यापही रेवस फिडरमधील वीज ग्राहकांचा त्रास कमी झालेला नाही. अखेर आज महावितरण विभागाच्या पंतनगर येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांना सरपंच, ग्रामस्थांनी जाऊन घेराव घातला. यावेळी सरपंच, ग्रामस्थांनी होणार्‍या त्रासाचा पाढाच वाचला. यावेळी अधिकार्‍यांच्या कार्यालयातीलच वीज गेल्याने उपस्थितांनी महावितरणच्या कारभारासमोर हातच जोडले. कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देऊन 15 दिवसांत रेवस फिडरवरील अडचणी सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिला आहे. भिसे यांनीही लवकरच ही अडचण सोडविण्याचे आश्‍वासन उपस्थितांना दिले.

तर प्रत्येक अधिकार्‍याच्या घरासमोर आंदोलन

आजपासून 8 दिवसात महावितरणचे अलिबाग 2 चे कनिष्ठ अभियंते आपापल्या कार्यक्षेत्रास वास्तव्यास न गेल्यास महावितरणच्या कार्यालयाबरोबरच अधिकार्‍यांच्या अलिबाग तसेच अन्य ठिकाणच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलने सुरु करण्याचा इशारा यावेळी दिलीप भोईर यांनी दिला. जे कनिष्ठ अभियंते आपल्या कार्यक्षेत्रास वास्तव्यास न गेल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे. नियम फक्त ग्राहकांनी पाळायचे का असा सवालही यावेळी करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात देखील 16 -16 तास विजपुरवठा खंडीत होत होता. दिवसरात्र ट्रिप होऊन विजपुरवठा खंडीत होत असतो. कोणत्याच उपविभागाचे कनिष्ठ अभियंता नियमानुसार आपापल्या कार्यक्षेत्रात राहत नसल्याने त्यांना याची झळ जाणवत नाही. बहुतांश उपअभियंते देखील अलिबाग शहरातच वास्तव्यास आहेत. त्यांमुळे सर्वच अधिकारी एकमेकांवर जबाबदार ढकळून मोकळे होतात. मोठा बिघाड झाल्यानंतरही ग्राहकांना त्याची सुचना दिली जात नाही. या सार्‍या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त