रोहा

आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण असणार्‍या जिल्हा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे रोहा तालुक्यातील महाळूंगे येथील सरपंचांचे वडिल आणि ग्रामपंचायत सदस्य असणारे गोवर्धन कांडणेकर यांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. याप्रकारामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून संताप व्यक्त केला जात आहे. केवळ कोरोना रुग्ण समजून उपचार करण्यापूर्वी इतर तपासण्या करणे देखील आवश्यक असल्याचे मत रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.

रोहा तालुक्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीचा झालेला मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीय मंडळींकडून सांगितले जात आहे. परंतु, रोहा उपजिल्हा रुग्णालय असो की जिल्हा रुग्णालय अलिबाग, उपजिल्हा रुग्णालय पनवेल एकाही ठिकाणी संबंधित रुग्णाचा इसिजी काढण्यात आला नाही किंवा अन्य टेस्ट करण्यात आल्या नाहीत. कोरोना सदृश्य लक्षणे असणार्‍या व्यक्ती टेस्टमध्ये निगेटिव्ह येत आहेत तर कोणतीही लक्षणे नसणार्‍या व्यक्ती कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर येणार्‍या प्रत्येक रुग्णाची सर्व बाजूने तपासणी करणे आवश्यक असताना सर्व रुग्णांना एकाच पध्दतीने तपासले जात असल्याने अन्य रोगांनी त्रस्त व्यक्ती नाहक बळी पडत आहेत.

लॉकडाऊन चालू झाल्यापासून जिल्ह्याची सर्व सूत्रे जिल्हाधिकारी यांच्या हातात आहेत. यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना गरम पिण्याच्या पाण्याची सोय, अन्य रोगांनी त्रस्त रुग्णांसाठी औषधोपचाराची वेगळी व्यवस्था, आरोग्य यंत्रणेला आवश्यक मनुष्यबळ व इतर सुविधा पुरविणे ही जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे. प्रत्यक्षात मात्र तीन महिने होऊन देखील यामध्ये कुठेही सुसूत्रता दिसून येत नाही. जिल्ह्यातील स्वॅब तपासणीचे प्रमाण देखील नगण्य आहे. जिल्ह्यात 28 जून पर्यंत केवळ 8381 लोकांचे स्वब नमुने तपासण्यात आले असून त्यातील 3449 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. रायगड जिल्ह्याचा विचार करता देशातील व राज्यातील तपासणी व पॉझिटिव्ह रुग्ण यांचे प्रमाण पाहता जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. पण प्रशासनाकडून डोळेझाक होत आहे हे रायगडवासीयांचे दुर्दैव. जिल्ह्याच्या आकडेवारीमधून पनवेल शहर व ग्रामीण तसेच उरण तालुक्याची आकडेवारी वगळली तर स्वॅब नमुने तपासणी अतिशय कमी आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून रुग्णालयात दाखल होणार्‍या सर्व रुग्णांबाबत एसओपी राबविणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार लोकांकडून व्यक्त होत आहे.

रोहा तालुक्यातील महाळूंगे येथील गोवर्धन कांडणेकर यांना ताप येत असल्याने खाजगी डॉक्टरने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र शासकीय रुग्णालयात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने संबंधीत यंत्रणेंने त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार प्रक्रिया करीत असताना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. संबंधीत डॉक्टर तब्बल 15 मिनीट उशिरा आल्या. त्यानंतर रुग्णवाहिका सुरु होत नव्हती. तशा अवस्थेत धक्का मारुन रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. अलिबाग येथे पोहचल्यावर सुरुवातील जागे अभावी दाखल करुन घ्यायलाच असमर्थता रुग्णालयातून दाखविण्यात आली. माजी आमदार पंडित पाटील यांनी स्वतः जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधल्यानंतर रुग्णाला दाखल करुन घेण्यात आले. मात्र तेथे दाखल केल्यानंतर आवश्यक त्या तपासण्या न करता केवळ कोरोना रुग्ण समजूनच हाजचाल करण्यात आली. त्यामुळे वेळेवर योग्य तो निदान झाल्याने प्रकृती नाजूक झाल्यानंतर त्यांनी येथे उपचार होणार नसल्याचे सांगत सदर रुग्णाला पनवेल येथे हलविण्याची सुचना केली. मात्र तेथेही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने निघायलाच उशिर झाला. पनवेल येथे नेण्यापुर्वी तेथे संपर्क साधून आवश्यक ते नियोजन करणे आवश्यक असताना तशी कोणतीही कृती आरोग्य विभागाकडून करण्यात न आल्याने प्रत्यक्षात तिथे पोहचल्यावर मात्र जागा नसल्याने प्रवेश नाकारण्यात आला. त्यावर पनवेल मनपातील विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सुत्रे हलविल्यानंतर सीटी रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आले. तोपर्यंत अगदी चालत दाखल होण्यास जाणारे गोवर्धन कांडणेकर यांचे नातेवाईक तेथे काहीच सोय नसल्याने घरी पोहचल्यावर रुग्णालयातून रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने ताबडतोब येण्यास सांगितले. मात्र रुग्णालयात पोहचायच्या आतच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यामुळे पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या सव्र प्रकारावरुन जिल्हा आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणानेच कांडेणकर यांचा बळी घेतला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.