रोहा

( जितेंद्र जोशी ) रायगड जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्री पासून लॉकडाऊन घेत असल्याचा निर्णय पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर करताच जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या विरोधात टीकेची झोड उठविल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनापेक्षा लॉकडाऊन हा गंभीर संसर्गजन्य आजार झाला असून रोगापेक्षा इलाज भयंकर असे देखील काहींनी कुत्सितपणे बोलून दाखविले आहे.

कधी देशव्यापी तर कधी राज्यव्यापी हे कमी म्हणून कधी तालुक्याचा तर कधी ग्रामपंचायतीचा तर कधी गावाचा लॉकडाऊन यामुळे सारेच त्रस्त झाले आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणली.अनेक राज्यांना कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.परंतु महाराष्ट्रातील तिघाडी सरकारला मात्र कोरोना संसर्गाची लागण रोखण्यात मागील चार महिन्यात अपयश आल्याचेच उपलब्ध आकडेवारी वरून दिसून येत आहे.या काळात अनेकांचे रोजगार गेले.काहींचे व्यवसाय ठप्प झाले.पण शासन व प्रशासन मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने काहीच ठोस पावले उचलत नाही अशी सामान्य जनतेची भावना झाली आहे.कोरोना 14 दिवसात मरतो,21 दिवसात मरतो यावर विश्‍वास ठेवत जनतेने प्रामाणिकपणे बंद पाळला. थाळ्या वाजवून, दिवे लावून कोव्हीड योध्यांचे कौतुक देखील केले.पण कोरोना काही जाईना.त्यातच जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य यंत्रणेमुळे जिल्ह्यातील अनेकांनी आपले आप्तस्वकीय कोरोनामुळे गमावले.याचा राग काढत रायगडच्या जनतेने 15 जुलैच्या मध्यरात्री पासून जाहीर केलेल्या बंदला कडाडून विरोध केला आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून जिल्ह्यातील जेएनपीटी, जेएसडब्लू,रिलायन्स पेट्रोकेम तसेच महाड,रोहा,पाताळगंगा,खालापूर,रसायनी,विळे भागाड या औद्योगिक वसाहतीमधील बहुतेक कारखाने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बिनदिक्कतपणे सुरू आहेत.या कारखान्यातील कामगार व अधिकारी वर्गामुळे जिल्ह्यात कोरोना फैलाव झाल्याने जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. सदर कारखाने बंद करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधी यांनी वारंवार

 करून देखील कारखानदारांचे हित जपले जात असल्याचे दिसून येत असल्याने रायगडच्या जनतेने या लॉकडाऊनला विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना लॉकडाऊन मात्र कारखान्यांना मात्र अनलॉक हि प्रशासनाची भूमिका नागरिकांना मान्य नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रतिक्रिया पाहता दिसून येत आहे.

सततच्या लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे.आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या रायगड मधील जनतेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा देखील मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला आहे.जिल्ह्यातील सुमारे 100 गावात चाळीस दिवस उलटूनही वीज पुरवठा खंडित आहे.नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा नाही.बँकांचे,खाजगी वित्त संस्था यांचे कर्जाचे हफ्ते ठकल्याने त्यांच्या कडून हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.त्यातच आलेली भरमसाठ वीज बिले भरली नाही तर पावसाळ्यात वीज कपात होण्याची भीती यामुळे कोरोनासाठी मदतीची भिक नको पण हा लॉकडाऊनरूपी कुत्रा आवरा असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा सक्षम करा.बाजारपेठा अधिकाधिक काळ खुल्या ठेवा.जनतेला रोजगार उपलब्ध करून दयावा अशा मागण्या जनतेने व्यक्त केल्या आहेत.चार महिन्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्यात शासनाला आलेले अपयश झाकण्यासाठीच लॉकडाऊनचा मार्ग अवलंबून जनतेचा आवाज दाबला जात असल्याचे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....