अलिबाग 

कृषीवलेच वृत्तसंपादक रविराज पाटील यांचे मंगळवारी पुण्यात कोरोनाने धक्कादायक निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल रायगड जिल्ह्यासह राज्यभरात पत्रकारिता क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

कृषीवलचे वृत्तसंपादक म्हणून कार्यरत असणारे पत्रकार रविराज पाटील (36 वर्षे) आणि त्यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ते सावरत होते. संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर देखील ते पूर्णपणे बरे झाले नव्हते. त्यामुळे पुढील तपासण्या करण्यासाठी त्यांचे बंधु धिरज पाटील यांच्या सोबत ते अलिबाग मधून पुण्यात सोमवारी गेले होते. कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांचे जुने आजार उफाळून आले. सकाळी त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यावर उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात गेले होते. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर  पुण्यात एक्सरे एमआयआरआय करण्याच्या दरम्यान ते गाडीत बसले असतानाच त्यांना हृदयरोगाचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मावळली!

रविराज पाटील यांच्या पश्‍चात आई वडिल, पत्नी, दोन लहान मुलं, भाऊ वहिनी असा मोठा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावचे ते मूळ रहिवासी होत. त्यांनी कृषीवलसह सकाळ, पुढारी, लोकमत, पंढरपूर भुषण अशा विविध दैनिकांत आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे रात्री 2 वाजता मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविराज पाटील यांच्या धक्कादायक निधनाने रायगड जिल्ह्याबरोबरच राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे. कृषीवल परिवाराच्या वतीने कार्यालयात सर्व सहकार्‍यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त