पनवेल  

सुंदर अन् स्वच्छ शहरे निर्माण करण्याचा टेंभा मिरवणार्‍या सिडकोचा गचाळ अन् भोगलं कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. कळंबोली वसाहतीमधील सेक्टर चारमध्ये असणार्‍या सिडकोच्या उद्यानाला कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक व बच्चे कंपनीसाठी असणार्‍या उद्यानात चक्क वाहने उभी केली जात असून उद्यानाची पूर्ती वाट लावून टाकली आहे. मात्र याबाबत लेखी तक्रार दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानात केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी साचून उद्यानाला तलावाचे स्वरूप येत असूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी लावलेली झाडे जगात नाही. याबाबत कळंबोलीवासियांनी संताप व्यक्त केला आहे.

कळंबोली वसाहती मधील सेक्टर 4 मधील असणारे सिडकोचे उद्यान बेवारस असल्यासारखे झाले आहे.या उद्यानाला काही वर्षांपूर्वी भिंतीचे काम केले होते. त्यानंतर त्यामध्ये लाखो रुपये खर्च करून नागरिकांना फिरण्यासाठी पाथ वे व बसण्यासाठी कठडे तयार करण्यात आले. तसेच लोखंडी दरवाजा बसवण्यात आला.लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी बसवण्यात आली. मात्र या उद्यानात कायदा व नियम धाब्यावर बसवून मंडप टाकून सार्वजनिक कार्यक्रम केले जात आहेत. त्यामुळे उद्यानात नागरिक व लहान मुले खेळण्यासाठी किंवा नागरिक चालण्यासाठी जाऊ शकत नव्हते. त्यातच उद्यानाचा लोखंडी दरवाजा चोरीला गेल्याने उद्यानात वाहन चालकांनी आपली वाहने उभी करण्यास सुरवात केल्याने नेमके उद्यान कोणासाठी आहे हा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला आहे.वाहने नियम धाब्यवर बसवून उभी केल्याने उद्यानाचे वाहनतळ झालेले आहे. पावसाळ्यात उद्यानात गवत वाढल्याने सरपटणार्‍या जनावरांची भीती नागरिकांना सतावत आहे. या बाबत नागरिकांना सिडको अधिकार्‍याकडे लेखी पत्र देऊन वाहने पार्क करण्याची मागणी केली आहे. मात्र सिडको अधिकार्‍यांना या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही. याच उद्यानात दारुडे राजरोस दारू पिण्यास बसतात अन् काचेच्या व प्लॅस्टिक बाटल्या फोडून जातात.उद्यानाच्या आजूबाजूच्या सोसायटी मधील नागरिक सदरचे उद्यान दत्तक घेऊन सुशोभित करण्यास तयार आहेत. मात्र सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा रहिवाशी आरोप करीत आहेत.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....