नेरळ  

कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. कोरोनाची साखळी तुटवी म्हणून  कर्जतच्या व्यापारी वर्गाने आज सोमवार पासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. कर्जत शहराबरोबरच कडाव व डिकसळ सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.

 एका उत्तरकार्यात उपस्थिती दर्शविल्यामुळे 21 जणांना कोरोनाची लागण झाली. दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे. कर्जत शहराबरोबरच शहराच्या लगत असलेल्या गावांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही साखळी तोडण्यासाठी कर्जतच्या व्यापारी वर्गाने कर्जत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी फेडरेशनच्या सभेमध्ये जाहीर केला. त्यानुसार आजपासून कर्जत कडकडीत बंद आहे. तसेच तालुक्यातील कडावची बाजारपेठ मागील दोन दिवसांपासून बंद आहे.तर गेली अनेक दिवस कोरोना पासून दूर असलेल्या डिकसळ गावात कोरोना ने शिरकाव केला आहे.त्यामुळे तेथील  व्यापार्‍यांनी सुध्दा कर्जत बंद सारखा आपल्या भागातील दुकाने बंद ठेवली आहेत. कधी नव्हे ते किरवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेले डी - मार्ट सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.किरवली ग्रामपंचायत हद्दीत बोरवाडी,किरवली गावात रुग्ण आढळून आल्याने किरवली ग्रामपंचायत ने डी मार्ट प्रशासनाला बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.

बंद मध्ये कर्जत बाजारपेठेतील दुकाने बंद आहेत,मात्र बँकांचे व्यवहार सुरू असल्याने बँके बाहेर ग्राहकांची थोडी गर्दी होती. एकंदरीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात येत असलेला बंद शंभर टक्के यशस्वी होत आहे.मात्र कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण ज्या नेरळ गावात आहेत,तेथील बाजारपेठ मात्र सताड उघडी आहे.