माणगांव 

 कोरोना साथीमुळे गत दोन महिन्यापासून लॉक डाउन सुरू आहे. त्यामुळे घराबाहेरील सर्व व्यवहार ठप्प झाले असून आबालवृद्धांची मोठी गैरसोय होऊन घराबाहेरील कोणतीच कामे वा मनोरंजनात्मक बाबी करता येत नाही.लहान मुलांचे खेळ,सायकल चालविणे ,फिरणे आदी बाबी बंद आहेत.नोकरी,व्यवसाय बंद असल्याने  पालक व घरातील जेष्ठ मंडळी घरी आहेत.त्यामुळे घरातील सर्व माणसांना एकमेकांचा सहवास लाभत असून घरच्या घरी विचारांची देवाणघेवाण होत असून नाते संबंध अधिक दृढ होत आहेत.

धावपळीच्या जीवनात माणसे एवढी व्यस्त होती एकमेकांना वेळ देणे शक्य नव्हते. नोकरी ,व्यवसाय शाळा इत्यादी मुळे प्रत्येकजण व्यस्त होता.त्यामुळे घरातील संवादावर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे कौटुंबिक ताणतणावात अनेक कुटुंबे होती .मात्र कोरोना महामारीच्या काळात बाह्य जग बंद झाले असताना चार भिंतीमधील घरकुल मात्र हसते झाले आहे.घरातील पालक संपूर्ण दिवस एकमेकांना वेळ देत असल्याने कौटुंबिक वातावरण हसते खेळते झाले असून अनेक घरातून एकत्रित गप्पा, गाणी ,खेळ मनोरंजन केले जात आहे.त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत असून लोकडावून मुळे कौटुंबिक आनंदाचा अनुभव मिळत असल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले आहे.

एकत्रित भोजन,खेळ,मनोरंजन व संवाद यामुळे नाते संबंध अधिक दृढ होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.     समाजमाध्यमांचा प्रसार होण्यापूर्वी घरोघरी बुद्धिबळ ,सापसीडी, काचा मण्यांचे खेळ,पट ,कॅरम ,सारीपाट इत्यादी अनेक खेळ घरोघरी मोठया आवडीने खेळले जात असत.दूरदर्शन वाहिन्यांचे जाळे पसरले व समाज माध्यमांचा प्रसार वाढल्यानंतर घरोघरी खेळल्या जाणारे पारंपारिक खेळ अडगळीत गेले होते.यातील अनेक खेळ तर नवीन पिढीला माहीतही नव्हते. लॉकडावून काळात घरातील वरिष्ठ मंडळींना मोकळा वेळ व सर्व कुटुंब घरीच असल्याने अनेकांना या पारंपारिक खेळांची आठवण झाली असून हे खेळ खेळण्याकडे अनेक घरातून आबालवृद्ध व्यस्त असलेले व लॉक डाउन सुसहय करण्याकडे वळले आहेत.

यातून नवीन पिढीला पारंपारीक खेळांची माहिती होत असून सतत टीव्ही वर व समाजमाध्यमांवर व्यस्त असणार्‍या नवपिढीला मनोरंजनाची वेगवेगळी साधने माहिती होत आहेत.काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला पारंपारिक खेळांचा वारसा कोरोनामुळे पुनः जागृत होत आहे.या सर्व खेळांमुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येउन खेळण्याचा व निखळ आनंदाचा अनुभव घेत असून कुटुंब व्यवस्था घट्ट होऊन नातेसंबंध अधिक दृढ होत असल्याची भावना समाज अभ्यासक व मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....